सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे या छोट्याशा गावातील बंजारा समाजातील युवा उद्योजक संतोष पवार यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याच्या मैदानात उडी घेतली आहे. त्यांचा उद्देश राजकीय नसून तालुक्याच्या विकासासाठी आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दक्षिणसह उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या दोन्ही तालुक्यातील प्रश्न व समस्या आपण सोडविणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
रविवारी संतोष पवार यांनी आपल्या ‘मार्ग फाउंडेशन’च्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे टीम मेंबर असिफ यत्नाळ, योगेश राठोड, संतोष राठोड, अनिता राठोड, मिथुन राठोड यांची उपस्थिती होती.
पवार म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात तालुक्यांच्या विकासाच्या उद्देशाने मला काम करायचे आहे. त्यासाठी मला शासकीय मदत सुद्धा आवश्यक आहे. शासनाच्या योजना त्या प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे ‘मार्ग फाउंडेशन’ काम करणार असून त्यासाठी शासकीय कार्यालयात जागा मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक गावातील कोणतीही समस्या असेल ही आमच्याकडे सांगावी ती सोडवण्यासाठी आम्ही शासकीय पातळीवर प्रयत्न करू. गावा गावांचा विकास झाला पाहिजे, आम्हाला मोर्चा, आंदोलन, तोडफोड करण्यात इंटरेस्ट नाही तर तो शासकीय पातळीवर कशा पद्धतीने सोडवता येईल यासाठी प्रयत्न असेल. सध्याचे राजकीय नेतृत्व विकासासाठी कुठेतरी कमी पडत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप एमआयडीसीचा प्रश्न सूटावा यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत, सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी ही प्रयत्न सुरू आहेत.
संतोष पवार हा चेहरा 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चर्चेत आला. तालुक्यातील बंजारा समाजाच्या त्यांनी बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधल्याचे पहायला मिळाले. दक्षिण सोलापूर विधानसभा लढवतील अशी चर्चा होती मात्र ते निवडणुकीपासून लांब राहिले. तरीही त्यांचा फोकस दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावरच दिसून येत आहे.

















