सोलापूर : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सोमवारी सोलापुरात कर्मचाऱ्यांनी सरकारला कानठळ्या बसेल असे जोरदार थाळीनाद आंदोलन करत लक्ष वेधले. आरं..नागपूरचा ‘भामट्या’ ठाण्याचा ‘चिंट्या’ पेन्शन दे अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध व्यक्त केला.
जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची पदे निरसित करु नका, अनुकंपातत्वावर वारसांना विनाअट नियुक्त दया, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या या मागण्या दिर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू आहे.
सोमवारी आंदोलनाचा सातवा दिवस होता, सोलापुरात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने थाळीनाद आंदोलन केले. यावेळी जोरदार झालेल्या थाळीनादाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.


















