सोलापूर : आमदार श्रीकांत भारती यांच्या पुढाकाराने सोलापुरातील युवा नेते उदय पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष कार्यालय मुंबई येथे पक्षप्रवेश झाला. भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश प्रक्रिया पार पडली. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार सचिन कल्याणशेटी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अण्णाराव बाराचारे हे उपस्थित होते.
पक्ष प्रवेश करण्यापूर्वी उदय शंकर पाटील यांनी एक पत्र प्रसिद्ध केले होते मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे परंतु या प्रवेश कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित नव्हते.
प्रवेशानंतर उदय पाटील म्हणाले, देशातील एवढ्या मोठ्या पक्षाने मला प्रवेश करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या चरणी नमन करून मी भारतीय जनता पार्टीचे आजपासून काम सुरू करणार आहे. सोलापूर जिल्ह्यात काम करताना हिंदू धर्मासाठी, सनातन परंपरेसाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी निरपेक्ष भावनेने काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
सोलापूरच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीत नव्या समीकरणांचा उदय झाल्याची चर्चा आहे. लिंगायत समाजातील युवा नेते असलेले उदय शंकर पाटील यांचा भाजप प्रवेश कुणासाठी धोकादायक ठरतोय हे भविष्यात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

















