काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बाबत काढलेल्या अपशब्दाच्या निषेधार्थ भाजप व शिवसेना एकत्र येऊन संपूर्ण राज्यात गौरव यात्रेचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या सोलापुर शहर मध्य विधानसभा मतदार संघात रविवार 2 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आले होते. रविवारी रंगभवन चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील राजांच्या पुतळयास अभिवादन करून वीर सावरकर गौरव यात्रेस शुभारंभ करण्यात आला.
या यात्रेत खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार नरसिंग मेंगजी, भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, चन्नवीर चिट्टे, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, माजी महापौर श्रीकांचना यंनम, इंदिरा कुडक्याल, अक्षय अंजिखाने, प्रेम भोगडे, शिवकुमार कामाठी यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोलापुरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख नेते म्हणून जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हेच उपस्थित दिसून आले इतर काही नेत्यांनी मात्र या यात्रेकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आलं.
छत्रपती रंगभवन चौकातून सुरू झालेली ही यात्रा सिविल हॉस्पिटल वोटफाडी चौक पोलीस मुख्यालय समोरून यात्रेचा सांगता वीर सावरकर पुतळा अशोक चौक येथे समारोप झाला.
विक्रम देशमुख म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये यांचे जाज्वल्य योगदान होते, सर्वाधिक काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले म्हणून वीर सावरकर यांचे नाव आहे, हे देश विसरून चालणार नाही. राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी ही यात्रा नाही, तर राहुल गांधी यांनी अनेक खटल्यांमध्ये जाहीर माफी मागितली आहे त्यामुळे यापुढे गांधी यांची कुठलीही चूक हिंदुत्ववादी युवक खपवून घेणार नाही अशी भूमिका मांडली.

















