सोलापूर : शहरातील सर्वात मोठ्या असलेल्या लष्कर गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ मिरवणुकी दरम्यान काहीसा गोंधळ उडाला. डॉल्बीचा आवाज जास्त असल्याने पोलिसांनी पीना काढून नेल्या, त्यामुळे संतापलेल्या भक्तांनी मिरवणुका आहे त्या जागेवर थांबवल्याने वातावरण तणावपूर्ण बनले मात्र मध्यवर्तीच्या ज्येष्ठ संस्थापक सदस्यांनी हस्तक्षेप केल्याने मिरवणूक मार्गस्थ झाली.
सकाळी नऊ वाजता मानाच्या गणपतीची पूजा झाल्यानंतर लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक मार्गस्थ झाली दरम्यान ही मिरवणूक लष्कर चौकात आली होती, या ठिकाणी डॉल्बीचा जोरजोरात आवाज सुरू होता, सदर बजार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले या आपल्या पथकासह बंदोबस्ताला थांबून होत्या.
पोलिसांना आवाजाची मर्यादा जास्त वाटल्याने त्यांनी कमी करण्यास सांगितले परंतु कुणी ऐकले नाही शेवटी पोलिसांनी साऊंड सिस्टिमच्या पिना काढल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला, पोलीस आणि मिरवणुकीतील सहभागी झालेल्या भक्तांमध्ये हमरीतुमरी सुरू झाली. आहे त्याच ठिकाणी भक्तांनी ठिय्या मांडला. यावेळी लष्कर मध्यवर्तीचे संस्थापक सदस्य प्रकाश पारसवार, देवेंद्र भंडारे यांच्यासह इतर पदाधिकारी त्या ठिकाणी आले.
आजपर्यंत लष्कर मध्यवर्तीच्या मिरवणुकीत कोणताही गोंधळ झाला नाही पोलिसांनी समन्वयाची भूमिका घ्यावी. इतर उत्सवात हस्तक्षेप केला जात नाही मग गणेशोत्सव दरम्यान का? असा प्रश्न उपस्थित करत डॉल्बी साऊंड सिस्टिमच्या पिना परत द्याव्यात यावर मध्यवर्ती महामंडळ ठाम राहिले.
नंतर पोलीस प्रशासन आणि मध्यवर्ती महामंडळाच्या सदस्यांनी चर्चेत समन्वय झाल्याने मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली.
दरम्यान पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी नियमानुसार जितका आवाज आहे त्याच्यावर साउंडचा आवाज असेल तर आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील असा इशारा दिला आहे.



















