सोलापूर : नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सूडबुद्धीने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावलेले आहे. या चौकशीच्या निषेधार्थ तसेच मोदी सरकारच्या चुकीचे धोरण आणि हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात आंदोलने सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी पुन्हा सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रकाश वाले म्हणाले, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व कॉंग्रेस नेते यांच्याकडून देशातील सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरणे, सातत्याने प्रश्न विचारणे हे केंद्रातील मोदी सरकारला नकोय. कुणी विरोधक राहू नये असा उद्देश मोदी यांचा आहे. सरकारने काही केलं तरी काँग्रेस मजबूत राहणार काँग्रेस आणखी बळकट होणार असे सांगतानाच नरेंद्र मोदी हे लोकशाही जपणारे नेते, तुम्ही हिटलर नाही, हुकूमशहा नाही, तुम्हीही विरोधी पक्षात होता अशी भूमिका व्यक्त केली….



















