सोलापूर-सोलापूर शहर आणि जिल्ह्यातुन काँग्रेसच्या वतीने मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी काँग्रेस कडून स्वतंत्र वाहने करण्यात आली होती. भारत जोडो यात्रेत जाताना बाळापूर येथे सोलापुरातुन निघालेल्या लक्झरी बसचा अपघात झाला होता. यामध्ये सात जण जबर जखमी झाले होते. यांना उपचारासाठी सोलापूरकडे परत पाठविण्यात आले होते.
पण अपघातातील या जखमींची दखल घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत जखमी अंबादास जाधव यांनी माहिती दिली. अपघातात जखमी होऊन परत आलो, पण एकही काँग्रेस नेता, आम्हाला पाहायला देखील आला नाही. सध्या सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. पण उपचारासाठी धावपळ होत असल्याने हातातील रोजगार निसटला आहे असेही अंबादास जाधव यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले.
17 नोव्हेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रेला जाताना बाळापूर येथे महामार्गावर डीवायडरला धडकून लक्जरी वाहन पलटी झाले होते. यामध्ये जवळपास पाच ते सहा महिला व दोन पुरुष जखमी झाले होते. जखमींना आश्वासन देण्यात आले होते की, सोलापूरला परत जा,तेथे उपचार करा, आम्ही खर्च देऊ पण कोणीही काँग्रेस नेता,आम्हाला बघायला किंवा विचारपूससाठी देखील आला नाही. या महिलांनी व पुरुषांनी स्वखर्चाने उपचार घेतले आहे.काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आमच्याकडे पाठ दाखवली आहे अशी केविलवाणी खंत जखमी अंबादास पिरप्पा जाधव (वय 47 ,रा, भटक्या विमुक्त जाती,झोपडपट्टी, लिमयेवाडी, सोलापूर) यांनी व्यक्त केली आहे.
जखमी अंबादास जाधव हे सोलापुरात अनेक काँग्रेस नेत्यांना भेटले आणि मी एक टेक्सटाईल कामगार आहे. रोजंदारीवर मजूर म्हणून काम करतो,मला उपचारासाठी मदत करा,पण त्या ठिकाणी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आणि आम्हाला हुलकाऊन लावण्यात आले.असे अंबादास जाधव यांनी माध्यमांना सांगितले.




















