सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांच्या गटामध्ये कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे. जरी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची क्रेझ कायम असली तरी राष्ट्रवादीचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते अजित पवार यांच्या संपर्कात जाताना दिसत आहेत.
राजकारणापासून बरेच दिवस दूर राहणारे सोलापुरातील मुस्लिम समाजातील नेते शफी इनामदार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशचे संतोष पवार, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, माजी गटनेते किसन जाधव, नागेश गायकवाड, विजय जाधव या नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल इनामदार यांनी दादांचा सत्कार करत त्यांच्या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवला.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे स्वातंत्र्यदिनी शासकीय ध्वजारोहणासाठी सोलापूरला आले असता शासकीय विश्रामगृहावर शफी इनामदार यांनी त्यांची भेट घेतली होती.