सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी नुकताच अजमेर शरीफ दौरा केला. या अजमेर दौऱ्यात महेश बॅंकेचे व्हाईस चेअरमन मल्लिनाथ मसरे, सिध्देश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बु, बाळासाहेब मुस्तारे, यांच्यासह एक चेहरा लक्ष वेधून घेत आहे तो म्हणजे काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यमान सिध्देश्वर बॅंकेचे चेअरमन प्रकाश वाले यांचा.
वाले हे शहराध्यक्ष पदावरून गेल्यापासून त्यांचा काँग्रेस पक्षात सक्रिय सहभाग दिसत नाही. शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे ते कट्टर विरोधक समजले जात होते. मात्र या एकत्रित अजमेर शरीफ दौऱ्याने आता चर्चेला उधाण आले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी विजयकुमार यांच्या विरोधात काडादी यांना सपोर्ट केल्याने देशमुख यांना अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शहर उत्तर मधील लिंगायत समाजांच्या नेत्यांना देशमुख यांनी पुन्हा जोडण्यास सुरुवात केल्याचे पहायला मिळते.
आजपर्यंत देशमुख यांच्या विरोधात तोंडसुख घेणाऱ्या प्रकाश वाले यांना सोबत घेतल्याने विजयकुमार यांनी आता माईंड गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. प्रकाश वाले आणि विजयकुमार देशमुख यांची जवळीक ही काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेसला ही डोकेदुखी ठरणारी आहे.
सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी विजयकुमार देशमुख यांना थेट आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटले होते. उत्तर मधून आता देशमुख विरोधात काडादी अशी लढत होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने काडादी यांना ताकद देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.





















