सोलापूर विकास मंचच्या वतीने गेल्या सत्तावीस दिवसांपासून होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई पर्यंत चक्री उपोषणाची दखल घेत तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी रविवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत सोलापूर विकास मंचला आणि सोलापूरकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली असून शुक्रवार दिनांक ०२ डिसेंबर रोजी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतनभाई शहा आणि योगीन गुर्जर यांची केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिदित्य सिंदिया यांच्या दिल्ली स्थित कार्यायल्यात त्यांच्या समवेत अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
शिष्टमंडळाचे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिदित्य सिंदिया यांनी “बोला सोलापूरकर” असे संबोधुन स्वागत केले. केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पां पैकी एक उडान योजने अंतर्गत सोलापूरची दोन वेळा निवड करण्यात आली, अलाईंझ एअरचे सोलापूर हैद्राबाद आणि स्पाईस जेटचे सोलापूर बेंगलोर ह्या मार्गावर ह्या योजने अंतर्गत प्रस्ताव आमच्या संबंधित विभागास प्राप्त झाले असून, होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित विभागांशी आम्ही संपर्कात असून सोलापूरांना केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या उडान योजने अंतर्गत नागरी विमानसेवेचा लवकर लाभ कसा मिळेल ह्यावर सकारात्मक निर्णय निश्चित घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिर आदित्य सिंदिया यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, सोलापूर विकास मंचचे सदस्य केतनभाई शहा आणि योगीन गुर्जर यांना दिली.
गेल्या २७ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पुनम गेट समोर होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई पर्यंत चक्री उपोषणाला देशा विदेशातुन पाठिंबा वाढत असल्याची माहिती सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी दिली, त्यावर ज्योतिदित्य सिंदिया यांनी सोलापूर विकास मंचच्या चक्री उपोषणावर माझेही लक्ष असून, आता आपण हे चक्री उपोषण थांबवण्याची विनंती ज्योतिदित्य सिंदिया यांनी केली. सोलापूरकरांच्या वतीने सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी सिंदिया यांना सोलापूर आणि अक्कलकोट भेटीचे आमंत्रण दिले त्यावर त्यांनी सकारात्मकता दर्शविली.
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिदित्य सिंदिया यांच्या समवेत झालेली बैठक संपूर्णपणे मराठी भाषेत झाली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि पुढाकाराने सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा आणि योगीन गुर्जर यांची केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिदित्य सिंदिया यांच्या समवेत यशस्वी बैठक झाली. चक्री उपोषणाविषयी सोलापूर विकास मंचच्या इतर पदाधिकार्यां समवेत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे सोलापूर विकास मंचच्या वतीने सांगण्यात आले.



















