सोलापूर : भूसंपादन वाटपात उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी तब्बल पावणे तीन कोटी जादा वाटप केले असून पदाचा गैरवापर केल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी काढला आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे बसवेश्वर नगर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन कामात संबंधित जमीनमालकाला दोन कोटी
७४ लाख पाच हजार ४०६ रुपये जास्त दिले आहेत. याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीत उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी अधिकारपदाचा गैरवापर केल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काढला आहे. याची सखोल तपासणी करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभर कर यांना देण्यात आल्या आहेत.
उत्तर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ सांगली तेसोलापूर या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे, हिरज, बेलाटी, बसवेश्वरनगर व देगांव या पाच गावांतील जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. कामासाठी सक्षम संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी पदाचा गैरवापर करून संबंधित शेतकऱ्याच्या संगनमताने राष्ट्रीय राज्य प्राधिकरणाची फसवणूक केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप शितोळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठवलेल्या तक्रारी निवेदनात केला होता.
विभागीय आयुक्तांनी तक्रारदार शितोळे यांचा अर्ज, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांचे म्हणणे व तोंडी युक्तिवाद लक्षात घेऊन संबंधित प्रकाराचा सखोल चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारीयांना दिल्याआहेत. प्राताधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. बसवेश्वर नगर येथील जमीन भूसंपादित करत असताना, तेथील एकच दस्त क्रमांक दोन वेळा नमूद असल्यास नियमानुसा अनुसूची २ व दस्त मागणी करून, मूल्यांकन दर निश्चित करताना व्यवहार विचारात घेणे आवश्यक होते.
उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी चुकीचे मूल्यांकन काढले आहे.दस्तची फोड केल्यामुळे दर निश्चितच वाढले आहे. दस्त क्र. ३१२५/२०१६ मधील दोन वेगवेगळ्या गटाचे क्षेत्र ३८ लाख ७२ हजार रुपयाला खरेदी केले असल्याचे नमूद करून, चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन दर निश्चित केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे संबंधित जमीनमालकास दोन कोटी ७४ लाख पाच हजार ४०६ रुपये जास्त आदा करण्यात आले आहेत.जमिनीचे चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन दर निश्चित करून भूसंपादन रक्कम वाटप केल्याचा निष्कर्ष काढला आहे.



















