कासेगांव : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील पूलावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे आज पहाटेपासून कासेगांवचा शहराशी संपर्क खंडीत झाला. गुरूवारी मध्यरात्रीपासून पहाटे दरम्यान विजांच्या कडकडासह झालेल्या मुसळधार पावसामुळे रानातून पाणी वाहू लागल्याने गांव ओढ्याला यंदाचा पहिला-वहिला पूर आला. ओढा दुथडी भरून वाहू लागला. ते पाणी पूलावरून वाहू लागल्याने संपर्क खंडीत झाला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव परिसरात यंदाच्या पावसाळ्यात पावसाने ओढ धरल्याने अनेक शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी लांबणीवर पडली होती. त्यातच काही शेतकऱ्यांनी जणू काळ्या आईची ओटी भरायची या भावनेतून धाडस करून पेरण्या केल्या होत्या तर बहुतांशी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनानुसार पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या करणे टाळले होते.
जुलै महिण्याच्या दुसऱ्या सप्ताहात सतत पावसाची रिपरिप झाल्याने शेतकऱ्यांनी वापस आल्यावर जुलै अखेरीस पेरण्या उरकून घेतल्या होत्या. पावसाच्या पहिल्या दोन महिन्यात दमदार पाऊस न झाल्याने गाव ओढ्याला पाणी आले नव्हते. काल गुरुवारी, ०४ जुलैच्या मध्यरात्रीपासून कासेगाव परिसरात मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. शुक्रवारी पहाटेपर्यंत झालेल्या पावसात शिवार चिंबचिंब भिजल्याने गाव ओढ्यावर पूर आला.
कासेगावचा पाणीपुरवठा अवलंबून असलेला तलाव या पावसामुळे भरला असून त्याचा सांडवा सुटला आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ सोसावी लागलेल्या कासेगांवकरांच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. या पावसाने कासेगांवला झोडपल्याने पूलावरून पाणी वाहात असले तरी ४० वर्षापूर्वीचा जूना पूल पाडून नव्याने बांधण्यात आलेला पूलाने ‘ खड्डा ‘ निर्माण केला आहे. त्यामुळे ही पाणी लवकर ओसरणार नसल्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



















