सोलापूर : अतिशय कडक शिस्तीच्या म्हणून केवळ दीड महिन्यातच आपली छाप निर्माण केलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मंगळवारी एक मोठा तडकाफडकी निर्णय घेतला. मागील पाच महिन्यांपासून अतिशय वादग्रस्त ठरलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा कारभार सांभाळणाऱ्या प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांचा पदभार काढून घेतला. एकीकडे कटकधोंड यांच्या कामाचे कौतुक त्यांनी करताना दुसरीकडे पदभार काढून घेण्याची ही प्रक्रिया पूर्ण केली.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत चालणाऱ्या जलजीवन मिशन योजनेत अनियमितता असल्याने त्याची चौकशी झाली त्यानंतर तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी याची चौकशी लागली. कोळी यांच्याबरोबरच उप अभियंता कटकधोंड यांची ही चौकशी सुरू आहे. कोळी यांची बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार द्यायचा कुणाकडे? असा विषय होता. 189 कामाच्या फायलींचा गोंधळ अशा परिस्थितीमध्ये कटकधोंड यांनी पदभार घेऊन मागील पाच महिने जिल्ह्याचे अकरा आमदार त्यासोबत अनेक स्थानिक नेत्यांना सांभाळून कामकाज केले आहे. काम करताना काही जणांचा विरोधही त्यांनी स्वीकारला परंतु जलजीवनची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे पाहायला मिळाले. शेवटी चांगल्या कामाचे बक्षीस नाही तर त्यांची चौकशी चालू असल्याने सीईओ आव्हाळे यांनी त्यांचा पदभार काढला आहे.
सध्या जिल्हा परिषदेमध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता कोळी यांच्याबाबत सर्वजणच वाईट बोलतात परंतु कटकधोंड यांचा पदभार काढल्याने जिल्हा परिषदेतील अनेक विभाग प्रमुख ‘ऑफ द रेकॉर्ड’ त्यांच्या कामाचे कौतुक करताना पहायला मिळत आहे.
सीईओ आव्हाळे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेतील सर्वांनाच अपेक्षा होती की, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा पदभार बांधकाम कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांच्याकडे कामाचा मोठा व्याप असल्याने बांधकाम 2 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याकडे येईल, परंतु अनपेक्षितपणे खराडे यांच्याकडे चार्ज देण्यात आला आहे. पहिलेच माझ्यावर कामाचा एवढा लोड अन् परत जलजीवन मिशनची किरकिरी आल्याने खराडे हे टेन्शन मध्ये असल्याची चर्चा झेडपी मध्ये रंगली आहे.