सोलापूर : सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वीरभद्र यादवाड, सरचिटणीस रामभाऊ यादव यांच्यासह संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले व निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे नवसाक्षर सर्वेक्षण अभियानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना राज्यस्तरावरील परिपत्रक अन्वये दिनांक १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत नवसाक्षर सर्वेक्षण अभियानासाठी
घरोघरी जाऊन माहिती घेऊन काम करण्याचे आदेश जिल्हा शिक्षण विभागाने दिलेले आहे. सदरचे काम
घरोघरी जाऊन माहिती घेत ऑनलाईन नोंदी करणे, परिपत्रक भरणे, माहिती घेणे, वरीष्ठांना माहिती देणे. ही
कामे शालेय वेळेत पार पाडावयाचे आहेत. याचा अध्यापनावर मोठा नकारात्मक परिणाम होणार आहे.
जून महिन्यापासून शिक्षकांना सेतू अभ्यासक्रम राबवावे लागले, शिवाय पायाभूत परीक्षा आत्ताच संपली आहे. लवकरच प्रथम घटक चाचणी परीक्षा होणार आहेत. जून पासून शिक्षकांना अध्यापनासाठी वेळच मिळालेला नाही. वरील कामाव्यतिरिक्त इतरही जसे मतदार नोंदणी कार्यक्रम, ऑनलाइन माहिती देणेघेणे नोंदी ठेवणे यासारख्या विविध अशैक्षणिक कामामुळे सध्या शिक्षक त्रस्त आहेत.
सहामाही अभ्यासक्रम अद्याप अपूर्ण असून दिवाळीपूर्वी तो पूर्ण करणे गरजेचे आहे. जनगणना व निवडणूक सारखे महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आम्ही पार पाडतच आहोत तरी या नवसाक्षर सर्व्हे अभियानसाठी प्रत्येक गावात सुशिक्षित बेरोजगार मोठ्या प्रमाणात असूनही सदरचे अभियान शिक्षकांना राबवण्यास देण्यात आलेले आहे. या सर्वेक्षण अभियानावर सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पूर्णपणे बहिष्कार घालण्यात येत आहे.