गणपती विसर्जनाचे औचित्य साधून मैत्री सोशल फाऊंडेशन व लोटस क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य नागरिकांकरिता मोफत आरोग्य प्रथमोपचार ही अनोखी संकल्पना राबवत त्यांनी श्री गणेशा चरणी आपली सेवा रुजू केली, कोणत्याही सरकारी धोरणांना न मोडता अगदी सेवाभावी वृत्तीने हा उपक्रम पार पडला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष विनायक साळुंके यांनी सांगितले की, गणेश विसर्जन हा पारंपरिक सण नागरिक अगदी उत्साहात साजरा करत असतात पण त्या उत्साहाच्या भरात दुर्दैवाने काही घडलेच तर त्या वेळी त्यांना धावपळ न होता प्राथमिक स्वरूपात का होईना आवश्यक ते उपचार वेळीच भेटावे हे निस्वार्थ जनसेवा करण्याच्या दृष्टीकोनातून उपक्रम राबविले.
या ठिकाणी त्यांनी काही आपत्कालीन वाटल्यास योग्य त्या हॉस्पिटलला त्यांना वेळीच पोहोचविण्यासाठी एक दिवसीय मोफत रुग्णवाहिका सेवाही स्वखर्चाने उपलब्ध करून दिली होती. विशेष म्हणजे अगदी चार महिन्याच्या नवजात बालकांपासून ते 85 वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत या ठिकाणी प्राथमिक स्वरुपात तपासणी करून उपचार देण्यात आले. या उपक्रमाचे सामान्य नागरिक,पोलिस ,महावितरण कर्मचारी, समाजसेवक तसेच बर्याच मंडळांच्या अध्यक्षांनी तोंडभरून कौतुक केले व प्रचंड प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता मदत केली.
याप्रसंगी मैत्री सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक साळुंके, लोटस क्लिनिकचे डॉ. महेश वसगडेकर, डॉ. अंजली वसगडेकर, सचिव संतोष कासे, कार्याध्यक्ष अभिनंदन भोसले, अशोक साळुंके, सुमन साळुंके, ग्रीष्मा साळुंके, निता कासे उपस्थित होते. उपक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्याकरिता आराध्या मेडिकलचे जयकुमार चाबुकस्वार, शुभम कोरे अविनाश आठवले, रमेश बनसोडे, सूरज वीरसुरे, रवी सुतार, अतूल गाडे यांनी मैत्रीपूर्ण सहाय्य केले.