सोलापूर : महसूल सप्ताह अंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घरोघरी अधिकारी यानुसार संपूर्ण प्रशासन गावोगावी जाऊन नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देत आहे.
याच महसूल सप्ताह अंतर्गत “सैनिक हो तुमच्यासाठी” हा उपक्रम घेण्यात आला. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान तसेच अडचणी सोडविण्यात येत आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे स्वतः मंगळवेढा तालुक्यातील येड्राव येथील शहीद किसन माने यांच्या निवासस्थानी गेले, तिथे त्यांनी शहीद माने यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार मदन जाधव, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे, मंडल अधिकारी शामला कुंभार, तलाठी सारिका कोंढारे यांची उपस्थिती होती.
शहीद माने यांच्या निवासस्थानी त्यांचे सुशांत माने व सचिन माने यांचे त्यांच्या पत्नी तसेच त्यांची छोटी मुले या सर्वांचा सन्मान केला. प्रांताधिकारी समींदर यांनी ही शहीद कुटुंबाचा तालुक्याच्या वतीने सत्कार केला. स्मारक स्वतःच्या शेतामध्ये आणि ते झाडाच्या खाली सावलीमध्ये असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना हे स्थळ आवडले. शहीद किसन माने हे कारगिल युध्दानंतर एका मिशनवर असताना झालेल्या अपघातात ते शहीद झाले. त्याची सर्व माहिती सुशांत माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
आशिर्वाद यांनी माने कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्या कुटुंबासोबत पोहे खाल्ले, चहा घेतला. स्वतः जिल्हाधिकारी आपल्या वस्तीवर आल्याने माने कुटुंबीयांचा चेहरा आनंदून गेल्याचे पहायला मिळाले.