सोलापूर : आरोग्य, पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषि, स्मार्ट सिटी योजनांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, जिल्हाधिकारी भारत वाघमारे आदिंसह विविध विभागांचे प्रमुख शासकीय अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले, मागील काही दिवसात सोलापूर साठी चांगले निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये वंदे भारत ही ट्रेन सुरू करण्यात आली. राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासाची व लोकोपयोगी कामे होत आहेत. जिल्हा वार्षिक विकास योजनेत सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाय व आदिवासी विकास योजनेसाठी 645 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा कृषी क्षेत्रात ही भरीव कामगिरी करीत आहे. गेल्यावर्षी देशभरात सोळा हजार कंटेनर केळी निर्यात झाली त्यापैकी 50 टक्के केळी निर्यात ही सोलापूर जिल्ह्यातून झाली आहे. वसुंधरा अभियान मध्ये राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी तसेच पंचायतराज अभियानात आणि उमेद अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदेचे शंभरकर यांनी विशेष अभिनंदन केले. महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.
त्यानंतर परेड निरीक्षण व परेड संचलन करण्यात आले. परेड संचलनात राज्य राखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद पथक, गृहरक्षक दल, पोलीस विभाग महिला व पुरूष पथक, शहर वाहतूक शाखा, सोलापूर शहर वाद्यवृंद पथक, तसेच श्वान पथक, फॉरेन्सिक सायन्स व्हॅन, बीडीडीएस, महारक्षक, वज्र वाहन, वरूण वाहन यांनीही या संचलनात सहभाग नोंदवला. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उपस्थितांची भेट घेऊन नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सोलापूर शहर व ग्रामीणच्या 29 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या महासंचालक पदकाचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राज्याच्या सेवेत नियुक्त झालेल्या दहा उमेदवारांना प्राथमिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. उत्कृष्ट तलाठी म्हणून अमोल कांबळे यांना गौरवण्यात आले. सूत्रसंचालन पोलीस कॉन्स्टेबल मलकप्पा बणजगोळे यांनी केले.
































