सोलापूर : मुस्लीम पाच्छा पेठेतील प्रसिध्द सुफी संत हजरत पीर अब्दुर्रहीमबाबा अन्सारी यांचा ६३ वा ऊर्स शरीफ महोत्सव येत्या ८ सप्टेंबरपासून चार दिवस साजरा होत आहे. यात पूर्वापार परंपरेनुसार विविध धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऊर्स महोत्सवाचे प्रमुख आकर्षण दोन दिवसीय कव्वाली मैफल होणार आहे.
मुस्लीम पाच्छा पेठेत हजरत पीर अब्दुर्रहीमबाबांच्या दर्गाहमध्ये होणाऱ्या या ऊर्स महोत्सवात ८ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता दर्गाहच्या गौसिया मन्झील अरबी मदरशातील मुला-मुलींच्या वक्तृत्व स्पर्धा, नात गायन, कुराण पठण आदी कार्यक्रम होतील. दि. ९ रोजी ‘ संदल ‘चा विधी संपन्न होणार असून तत्पूर्वी रात्री आठ वाजता बाबांच्या समाधीस्थळापासून संदलची शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रा गौसिया मन्झीलमध्ये परतल्यानंतर बाबांच्या पवित्र समाधीला संदल अर्पण केले जाईल. त्यानंतर कव्वालीची मैफल होणार आहे. तत्पूर्वी, सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरही आयोजिले आहे. डॉ. अब्दुल हाफिज जुनैदी (औषधशास्त्र), डॉ. जुवेरिया तन्झीर जुनैदी (स्त्रीरोग), डॉ. शेख खदिजा तबशीर (बालरोग), डॉ. अजिंक्य उकरंडे (प्लास्तिक सर्जरी), डॉ. कांचन उकरंडे (त्वचारोग व सौंदर्य प्रसाधने) हे तज्ज्ञडॉक्टर रूग्णांची वैद्यकीय तपासणी करतील. यावेळी नेत्र तपासणी करून अल्पदरात चष्मे वाटप केले जातील.
१० सप्टेंबर रोजी ‘ चिरागा ‘ च्या (दीपोत्सव) मुख्य कार्यक्रमातही कव्वालीची मैफल होणार आहे. दोन्ही मैफलीत दिवंगत प्रख्यात कव्वाल मास्टर हबीब नगरी निझामी यांच्या पट्टशिष्य परंपरेतील असरार नाझा आणि शाहीद अजमेरी (अहमदनगर), अस्लम निझामी (इंदापूर), मुन्ना-मोईन (सोलापूर) यांचा सहभाग राहणार आहे. या ऊर्सच्या पूर्वीपासून म्हणजे बाबांच्या हयातीपासून गौसिया मन्झीलमध्ये कव्वाली मैफलीची परंपरा अखंडपणे चालत आली आहे. तत्पूर्वी, समस्त भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात येईल. याचवेळी शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली निझामी यांचे बौध्दिक प्रवचन होणार आहे.
११ सप्टेंबर रोजी सकाळी जियारतीच्या धार्मिक विधीने ऊर्सची सांगता होणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यासह नगर, पुणे, हुबळी आदी भागातील बाबांवर असीम श्रध्दा बाळगणारे भाविक या ऊर्स शरीफमध्ये दर्शनासाठी येतात. या ऊर्स शरीफमधील सर्व कार्यक्रमांमध्ये सर्व हिंदू-मुस्लीम भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हजरत पीर अब्दुर्रहीम बाबा अन्सारी दर्गाह विश्वस्त समितीचे अध्यक्ष मुदस्सर शरफोद्दीन शेख यांनी केले आहे.