सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनाची धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या निषेधार्थ मंगळवारी संपूर्ण जिल्हा परिषद, सर्व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीचे कामकाज अतिशय कडकडीत बंद ठेवण्यात आले या प्रकरणातील आरोपींना अटक झाली असून त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मंगळवारच्या बंदमुळे जिल्हा परिषदेचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले होते. तरीही संपूर्ण दिवसभर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या जिल्हा परिषदेमध्ये बसून होत्या. त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या कार्यालयात बसून कामकाज केले.
एकीकडे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना दुसरीकडे कामकाज बंद होणे हे योग्य नाही. जिल्हा परिषदेमध्ये यापुढे अशा कोणत्याही घटना होणार नाहीत याची काळजी आता जिल्हा परिषद घेणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती. ही प्रवृत्ती अत्यंत निषेधार्थ आहे, मी पाहुणी आहे परंतु सोलापूरची बदनामी होऊ नये याची काळजी सोलापूरकरांनी घ्यावी असेही त्या भावनिक होऊन म्हणाल्या.
दरम्यान सीईओ आव्हाळे यांनी आपल्या विभाग प्रमुखांना मॅसेज पाठवला. बुधवारपासून जिल्हा परिषद पूर्ववत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी पाठवलेला मॅसेज काय होता वाचा सविस्तरपणे…
सर्व विभागप्रमुख,
सर्व गटविकास अधिकारी,
जिल्हा परिषद येथील तोडफोडीच्या प्रकाराबद्दल जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभाग तसेच सर्व संवर्ग च्या वतीने आज दि 12/9/2023 रोजी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पर्यंत उत्स्फूर्त पणे काम बंद आंदोलन पुकारण्यात आला.
सदर प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाकडून कायद्यानुसार कार्यवाही सुरू आहे. सद्यस्थिती मध्ये दुष्काळजन्य परिस्थिती व अन्य प्रशासकीय कामकाजाची सद्यस्थिती पाहता काम बंद आंदोलन चालू ठेवणे उचित होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांशी आपली बांधीलकी आणि उत्तरदायित्व लक्षात घेता मी आपणास आवाहन करते की आपण काम बंद आंदोलन तात्काळ स्थगित करून आपल्या कार्यालयात उपस्थित राहून नियमित कर्तव्य सेवा बजावण्यात यावी तसेच काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व संवर्गाच्या आणि कर्मचारी संघटनांच्या अधिकारी कर्मचारी यांनी देखील तात्काळ नियमित कामकाजावर हजर राहणे करिता आपले स्तरावरूनआवाहन करण्यात यावे
असे आवाहन मी करीत आहे
मनीषा आव्हाळे(भा प्र से)
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद सोलापूर