सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा वनवास मागील काही महिन्यांपासून कायम राहिला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाला तर मागील अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळालेला नाही. माध्यमिक शिक्षण विभागाला मात्र मारुती फडके यांच्या रूपात पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाला. प्रभारी पदभार असलेले संजय जावीर यांनी अचानकच प्राथमिक शिक्षण विभागाचा पदभार सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी फडके यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार दिला.
मात्र दोन्ही विभागाचा कारभार पेलण्याची ताकद या मारुतींमध्ये नव्हती. त्यांनी नाईलाजाने चार्ज घेतला परंतु सीईओ आव्हाळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्राथमिकचा पदभार बदलण्याचा निर्णय घेतला. द्यायचा कुणाकडे? हा विषय पुढे आला. तेव्हा नुकतेच काही महिन्यापूर्वी महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी म्हणून आलेले प्रसाद मिरकले त्यांच्याकडे आता प्राथमिक शिक्षण विभागाचा चार्ज देण्यात येणार आहे.
का मिळणार मिरकले यांच्याकडे चार्ज? असा प्रश्न जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित केला जातोय. यामागची अधिक माहिती घेतली असता समजले की, प्रसाद मिरकले यांचे शिक्षण एम ए एम एड असून अर्थशास्त्र विभागात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. ते शिक्षण या विषयात नेट उत्तीर्ण आहेत. ते लातूर जिल्ह्यातील असून रेनापुर या ठिकाणी डीएड बीएड कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली आहे. 2011 साली ते महिला बालकल्याण विभागात बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून जॉईन झाले.
मुंबई आणि ठाणे या ठिकाणी दोन वर्ष सेवा बजावल्यानंतर त्यांची बदली औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये महिला बालकल्याण अधिकारी पदावर झाली. पाच वर्ष औरंगाबाद येथे त्यांनी काम केले. 2023 साली ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये महिला बालकल्याण विभागात जिल्हा कार्यक्रमाधिकारी म्हणून जॉईन झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याचा पदभार मिळणार असल्याचे समजले.