सोलापूर : महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सध्या चांगलाच पेटला असताना सोलापूरमध्ये एका युवकाने गनिमी कावा पद्धतीने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर समाज आरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिले.
त्यांच्या अंगावर भंडारा उधळून धनगर समाजाच्या आरक्षणाकडे शुक्रवारी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. आज सोलापूर शहरासह जिल्ह्यात आणि राज्यात याच घटनेने सध्या चर्चेला ऊत आला आहे.
दरम्यान एवढा मोठा पोलिसांचा बंदोबस्त असताना शासकीय विश्रामगृहावर आत मध्ये बसलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून लक्षवेधणारा तो युवक कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेखर बंगाळे हे डिप्लोमा सिव्हील इंजिनिअर आहेत, ते शेतकरी कुटुंबातील असून घरची परिस्थिती हलाखीची परंतु त्यांनी आपल्याला सामाजिक कार्यात गुंतवून घेतले आहे.
शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी आंदोलन करून लक्ष वेधले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आता ते आपल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहेत.
महाराष्ट्र विकास आघाडी व क्रांतिवीर किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष असून या संघटनेच्या मार्फत ते सामाजिक कार्य करत असतात.
शुक्रवारी पालकमंत्र्याच्या अंगावर भंडारा उधळल्याने आता मराठा आरक्षणानंतर धनगर समाजाच्या आरक्षणाची चर्चा सुरू झाली आहे. मराठा समाजाप्रमाणेच धनगर समाजाला ही आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे.