सोलापूर : चंद्रभागाबाई यलगुलवार शाळतील शिपाई हनुमंत विठ्ठल काळे यांनी शेततळ्यात उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणात शिक्षण उपसंचालक पुणे विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शिपाई पदासाठी शालार्थ आयडी न देता शिक्षण सेवक म्हणून शालार्थ आयडी दिल्याने त्या शिपायाचा पगार संस्थेने केला नाही. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई व्हावी, मयताच्या पत्नीला तात्काळ अनुकंपा खाली नोकरीच घ्यावे, नोकरीवर असल्या पासूनचा मोबदला द्यावा अन्यथा मृतदेह उचलणार नाही या मागणीवर मृताचे वडील विठ्ठल काळे ठाम राहिले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार आव्हाळे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे या तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून अहवाल देण्याच्या सूचना केल्या. रात्री दीड वाजेपर्यंत सविस्तर अहवाल आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांना पत्र देण्यात आले.
त्या पत्रात..१. श्री काळे हनुमत विठ्ठल यांच्या २०११ पासून कर्तव्याचा मोबादल्याबाबत शासनास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करुन शासनाच्या निर्देशानुसार वेतन अदा करणेबाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात येईल.
२. त्यांची पत्नी श्रीमती सुनिता हनुमत काळे यांना संस्थेने अनुकंपा तत्वावर नियुक्ती करुन या कार्यालयास संस्थेने मान्यतेबाबतचा प्रस्ताव सादर केल्यानंतर शासननिर्णयानुसार तात्काळ कार्यवाही करणेत येईल.
३. या प्रकरणात दोषी कर्मचारी व अधिकारी यांचेवर कारवाई करणेबाबतची बाब वरिष्ठ कार्यालय व शासनस्तरावरील आहे. असा उल्लेख आहे, तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने ही पत्र दिले आहे. या लेखी मिळालेल्या पत्रानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्याचे समजले.