सच्चिदानंद बांगर यांची बदली ; सोलापुरात सुरू आहे चौकशी ; उमेश पाटलांनी केली आहे तक्रार
सोलापूर : प्रशासकीय चौकशी सुरू असलेले जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील दिव्यांग विभाग पाहणारे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यांची शासनाने बदली केली असून धाराशिव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पदावर त्यांची बदली झाली आहे.
सोलापुरात मागील तब्बल साडे पाच वर्ष बांगर यांनी काम केले आहे, ही कारकीर्द अतिशय वादग्रस्त राहिल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांची तक्रार दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांच्याकडे केली आहे.
उमेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये, सच्चिदानंद बांगर हे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या ६ वर्षा पासून कार्यरत आहेत. त्यांना चुकीची व बेकायदेशीर कामे करण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे दिव्यांगाच्या चांगल्या काम करणा-या संस्था व कर्मचारी यांना त्यांच्यामुळे त्रास होत आहे. दिव्यांग संस्थांना अनुदान व दिव्यांग शाळेतील कर्मचा-यांना वेतनासाठी निधी उपलब्ध असताना वेळेत पगार करत नाहीत. तसेच वेतन फरक व थकीत वेतन काढण्यासाठी टक्केवारी घेतात असा आरोप केला होता.
त्याअनुषंगाने दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संदर्भिय तक्रार निवेदनामध्ये नमूद केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने आपण आपल्या स्तरावरून सविस्तर चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आपल्या अभिप्रायासह या आयुक्तालयास सादर करावा अशा सूचना केल्या होत्या. त्याचा अजून चौकशी अहवाल अद्यापही गेला नाही असे असताना त्यांची बदली करण्यात आली आहे.