सोलापूरचा पालकमंत्री कोण? प्रशासन सुद्धा वाट पाहू लागले
राज्यामध्ये महायुतीची एखादी सत्ता आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाचा वाद गाजला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावरून बरीच खलबते पाहायला मिळाली. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता कोण मंत्री कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्ह्याला परक्या पालकमंत्र्यांची आता सवय झाली आहे. यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारांत सोलापूरला संधी मिळाली नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांसह कार्यकर्ते आणि जनता ही तितकेच नाराज झाली आहे.
मागील पाच वर्ष बाहेरील पालकमंत्री होता यंदा तरी आपल्या हक्काचा पालकमंत्री मिळेल अशी अपेक्षा होती. पण सोलापूरकरांची घोर निराशा झाली. आता कोण पालकमंत्री होतोय याची उत्सुकता असून मागच्या वेळी असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेच पालकमंत्री राहणार की देवेंद्र फडणवीस नव्याला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाची पालकमंत्री म्हणून चर्चा होऊ लागली आहे. प्रत्येकांच्या तोडून गोरे यांचे नाव पुढे येत आहे. राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना करावं अशी सुद्धा अनेकांची इच्छा आहे पण मागील वर्षभर चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री पद सांभाळल्याने आणि भविष्यात सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका असल्याने चंद्रकांत दादा हेच पालकमंत्री होतील असेही बोलले जात आहे.
दरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरला मंत्री पद न मिळाल्याने आणि पालकमंत्री पदावरून भारतीय जनता पार्टीला चांगलेच लक्ष केले. मंत्रीपद खेचून आणण्यात सोलापूरचे नेतृत्व सक्षम नसल्याचा टोला त्यांनी हाणला आहे.