दक्षिण व अक्कलकोट मध्ये कोणाला पसंती ; भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांनी प्रथमच केले मतदान ; अक्कलकोटच्या नाराजी निरीक्षकांसमोर मांडल्या तक्रारी
सोलापूर : भारतीय जनता पार्टीने यावेळी प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पदाधिकाऱ्यांमधून आमदारकीला पसंती उमेदवार म्हणून मतदान घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवारी अक्कलकोट पक्ष कार्यालय व शासकीय विश्रामगृहावर मतदान झाले. अक्कलकोट मधील नाराज पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांसमोर आपल्या तक्रारी मांडल्या.
दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी पुण्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी आमदार माधुरी मिसाळ हे निरीक्षक म्हणून नेमण्यात आले होते.
संबंधित मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती सदस्य, महापालिका किंवा नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्ह्यातील पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी यांना मतदानाचा अधिकार होता. प्रत्येकाने आपल्या पसंतीनुसार एक नंबर, दोन नंबर आणि तीन नंबर असे मतदान केले.
शासकीय विश्रामगृहावर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत 105 पैकी 91 जणांचे मतदान झाले. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, युवा नेते मनीष देशमुख हे आपल्या समर्थकांसह ठाण मांडून असल्याचे दिसून आले.
अक्कलकोट साठी भाजपच्या पक्ष कार्यालयात निरीक्षक माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत 71 जणांचे मतदान झाले होते. या मतदानाला आपणाला बोलावण्यात आले नाही म्हणून शासकीय विश्रामगृहावर अक्कलकोट मधून इच्छुक असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे, बाळासाहेब मोरे, रमेश पाटील, शिवसिद्ध बुळा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आमदार मिसाळ यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मिसाळ या शासकीय विश्रामगृहावर आल्या.
त्यावेळी त्यांच्यासमोर या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला आमदार बैठकीला बोलवत नाहीत. कोणतीही माहिती दिली जात नाही. तसे पाहायला गेले तर अक्कलकोट मध्ये सध्या भाजप 35000 मतांनी मागे आहे अशा बऱ्याच तक्रारी मांडल्या.
मिसाळ यांनी स्पष्टीकरण देताना माझ्याकडे प्रदेश वरून जितकी नावे आली त्या सर्वांना मी बोलावून घेतले यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा कोणताही संबंध नाही, उपस्थितांमध्ये जे जिल्हा पदाधिकारी, झेडपी, पंचायत समिती, बाजार समिती, नगरपालिका सदस्य आहेत त्यांनी मतदान करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी दहा जणांचे मतदान घेण्यात आल्याचे समजले.