अनगर अपर तहसील कार्यक्षेत्राच्या हद्दीतून ही गावे वगळली ! शासनाचा नवा अद्यादेश जारी ! उमेश पाटलांची अशी प्रतिक्रिया
सोलापूर : मोहोळ तालुक्यात मौजे अनगर येथे ‘अपर तहसील कार्यालय’ संबंधी शासनाने बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी नवा अद्यादेश जारी केलाय. त्यात अनगर अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्राला छोटी कात्री लावलीय. दळणवळणाचा विचार करता, तीन गांवे पूर्वीप्रमाणे मोहोळ तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राहतील, असं जिल्हाधिकाऱ्यांना सुचित केलंय.
अनगर येथे ‘अपर तहसील कार्यालय’ संदर्भाधिन २४ जुलै २०२४ अन्वये सुरु करण्यात आलं आहे. या कार्यालयांतर्गत मोहोळ तालुक्यातील ४३ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर मोहोळ शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी मोर्चे, बंद आणि आंदोलने करून त्यास विरोध प्रकट केला होता.
तथापि, वाहतुकीच्या व दळणवळणाच्या दृष्टीने नागरिकांची सोय आणि स्थानिक प्रशासकीय सोय यांच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, सोलापूर व पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने संदर्भाधिन पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावातील वस्तुस्थिती विचारात घेऊन त्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून वगळण्यात आलीत.
पेनूर, पाटकूल व तांबोळे ही ३ गावं अनगर अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून वगळून, ती मूळ मोहोळ तहसील कार्यालयाशी संलग्न करण्यात आली आहेत. पेनूर महसूल मंडळातील कोन्हेरी, सारोळे, पोखरापूर, खवणी व पापरी या गावांसह ४० गावे अनगर अपर तहसील कार्यालयांतर्गत कायम ठेवण्यात येत असल्याचं शासन निर्णयात नमूद करण्यात आलंय.
दरम्यान उमेश पाटील यांनी राजन पाटील, आमदार यशवंत माने यांना टारगेट करताना अनगर अप्पर तहसील कार्यालयांतर्गत समाविष्ट ४३ गावांपैकी पेनूर, पाटकुल व तांबोळे ही ३ गावे वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वास्तविक संपूर्ण अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी असताना, “दळणवळण सुविधा नसल्याचे” कारण देऊन केवळ ३ गावे वगळण्याचा निर्णय हा शासनाची व मोहोळ तालुक्यातील जनतेची दिशाभूल करणारा आहे. समाविष्ठ ४३ गावांपैकी ३० गावांमधून कुठलीही सार्वजनिक वाहतुक तथा दळणवळण सुविधा नाही. जर दळणवळणाची सुविधा नसणे या निकषावर आधारित ३ गावे वगळण्याचा निर्णय झाला असेल तर, याच निकषावर आधारित आणखी २७ गावे अनगर अप्पर तहसील कार्यालयातून वगळली गेली पाहिजेत, अशी भुमिका मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने मांडली आहे.