सोलापूरच्या दीपक आबांनी घातली ‘टोपी’ ; जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत अजित पवारांची साथ सोडली
सोलापूर : सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक मोठा धक्का बसला असून जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन एकला चलो चा नारा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी दुपारी झाली. तत्पूर्वी दीपक साळुंखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी साळुंखे पाटील यांनी डोक्यावर टोपी घातली होती ते चित्र सर्वांचे लक्ष वेधून गेले. आबांनी पहिल्यांदाच डोक्यावर टोपी घालून पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, आजपर्यंत चार वेळा दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांना आपण साथ दिली त्यानंतर एकदा विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सोबत राहिलो, त्यांच्या विजयात आपला मोठा वाटा होता. आता गणपतराव देशमुख यांच्या समर्थक कार्यकर्ते आणि शहाजी बापू पाटील या दोघांनी मोठ्या मनाने आपणाला साथ द्यावी अशी माझ्यासह सांगोल्याच्या जनतेची अपेक्षा आहे असे सांगत आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे दिला असल्याचे सांगितले.
दीपक साळुंखे पाटील हे शरद पवार यांचे अतिशय कट्टर समर्थक मानले जात होते परंतु अजित पवार हे महायुतीमध्ये गेल्याने त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता एक वर्षानंतर त्यांनी दादांची साथ सोडली आहे.
राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनीही अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनीही राष्ट्रवादीचे घड्याळ हातातून काढले आहे आता ते हाती काय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.