सुरेश हसापुरेंच्या विरोधात काँग्रेसचा गट सक्रीय ; पण प्रणिती ताई साधणार ‘करेक्ट टायमिंग’
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत सोलापुरात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर विशेष करून दक्षिण सोलापूर तालुक्यात पुन्हा काँग्रेस पक्षाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे हे आता दावेदार मानले जात आहेत.
2019 ची विधानसभा मध्य मधून लढवल्यानंतर 2024 च्या विधानसभेसाठी माजी आमदार दिलीप माने हे सुद्धा दक्षिणसाठी इच्छुक आहेत. तशी त्यांनी मोर्चेबांधणी ही सुरू केली आहे. लिंगायत समाजातील नुकतेच काँग्रेसमध्ये आलेले महादेव कोगनुरे यांनी सुद्धा आपली फिल्डिंग लावली आहे.
दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्या विरोधात दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षातीलच एक गट आता सक्रिय झाला आहे. काही कार्यक्रमांमध्ये जाणीवपूर्वक दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांना बोलवण्यात आले नव्हते. त्या कार्यक्रमात ‘माने हसापुरे’ नको म्हणून सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांना बळजबरीने उमेदवारी घेण्याचा आग्रह धरण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
दक्षिण सोलापूर तालुक्यात दिलीप माने आणि सुरेश हसापुरे एकत्र झाले तर काहीही होऊ शकते. या दोन्ही नेत्यांनी एकत्रित येऊन जी निवडणूक लढवली जाईल त्यामध्ये निश्चितच यश मिळेल अशी चर्चा आहे. नुकतेच प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याचे दौरे केले. या दौऱ्यांमध्ये प्रत्येक गावात सुरेश हसापुरे हा एकमेव नेता पहायला मिळाला. स्वतःला तालुक्याचे नेते म्हणवणारे नेते कुठेही दिसले नाहीत.
उमेदवार निवडताना निश्चितच काँग्रेसची डोकेदुखी होणार आहे परंतु लोकसभा निवडणुकीचे मैदान तयार करण्यात सिंहाचा वाटा असलेले सुरेश हसापुरे यांच्यासाठी खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नक्कीच काहीतरी नियोजन केले असणार. काँग्रेस पक्षाकडून दक्षिण मध्ये इच्छुकांची मांदियाळी पाहायला मिळते पण प्रणिती शिंदे याच करेक्ट टाइमिंग साधतील अशी चर्चा आहे.