बापरे ! सोलापूरचे आजपर्यंतचे उच्चांकी तापमान ; पारा गेला 43 डिग्री सेल्सिअसच्या पुढे
सोलापूर : सोलापूरची वाटचाल शोलापूरकडे यापूर्वीच सुरू झाली आहे. दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत असून सोलापुरात शुक्रवारचा दिवस सर्वाधिक तापमानाचा नोंदवला गेला. शुक्रवारी तापमान 43.1 डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेल्याने “बापरे ! एवढी धग” असा शब्द प्रत्येकाच्या तोंडून ऐकण्यास मिळत होता.
सोलापुरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ज्या पद्धतीने प्रचार तापू लागला आहे त्याच पद्धतीने सोलापूरचे तापमान सुद्धा आता वाढत चालले आहे. उन्हाचा तडाखा सकाळी 11 पासूनच सुरू होतो. त्यानंतर जसं जसं तापमान वाढत तसं तशी रस्त्यावरील गर्दी ही आता कमी दिसू लागली आहे.
प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी, तोंडाला रुमाल असे चित्र पाहायला मिळते. लिंबू सरबत च्या गाड्या ज्यूस सेंटर यावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. सायंकाळी चार ते पाच या दरम्यान तर सर्वात जास्त उन्हाची धग जाणवते. जमिनीमधून वाफा येत आहेत. हवेत अजिबात गारवा नसल्याने अंगाची लाही लाही होताना दिसत आहे.