सोलापूर : महापालिका प्रशासनाने धडक मोहीमेअंतर्गत 8 कोटी रुपयांच्या मिळकतकर थकबाकीपोटी रेल्वे प्रशासनाच्या मिळकतीवरील नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली आहे. यासह मंगळवारी शहरातील विविध ठिकाणच्या मिळकतदारांच्या थकबाकीपोटी 5 गाळे व एक कार्यालय सील करण्यात आले तसेच उत्तर कसबा पेठेतील 6 मिळकतदारांवर नळ बंद कारवाई करण्यात आली. उत्तर कसब्यातील गवंडी गल्ली येथील तीन सार्वजनिक नळ बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली.
सोलापूर महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे थकबाकीदारांच्या मिळकती सीलबंद आणि नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई मोहिम राबविण्यात येत आहे. आज शहरात मंगळवारी दिवसभरात रेल्वे लाईन, विजापूर रोड सोरेगाव, होटगी रोड औद्योगिक वसाहत, मंत्रीचंडक विहार यासह उत्तर कसबा परिसरात कारवाईची मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान, आज मंगळवारी विजापूर रोड सोरेगाव हद्दीतील सौ. पार्वतीबाई इतर मागास महिला सार्वजनिक वाचनालय यांचे तीन गाळे थकबाकी पोटी सील करण्यात आले. याच परिसरातील भोजराज शामराव पवार यांच्या कुबेर चेंबर येथील एक दुकान गाळा सील केला आहे. औद्योगिक वसाहत होटगी रोड येथील स्टार एंटरप्राइज यांचा एक गाळा व कार्यालय सील केले आहे. सोरेगाव हद्दीतील व मंत्रीचंडक विहार येथील असे तीन मिळकतदारांनी थकबाकी भरून कारवाई टाळली. उत्तर कसबा येथील सहा मिळकतीवरील नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. त्याचबरोबर उत्तर कसबा गवंडी गल्ली येथील तीन सार्वजनिक नळही बंद करण्यात आले आहेत.