सोलापूर : श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दहाव्यांदा विक्रम खेलबुडे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदाची दशक वर्षपूर्ती करत विक्रम खेलबुडे यांनी इतिहास घडविला आहे.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी सरचिटणीस समाधान वाघमोडे यांनी मागील वर्षाच्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले, त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मावळते खजिनदार संतोष शिरसट यांनी वार्षिक जमा- खर्च सादर केला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत बहुमताने विक्रम खेलबुडे यांनी प्रवीण संकपाळ यांचा 118 मताधिक्याने पराभव केला. एकूण 122 जणांनी मतदान केले. यामध्ये खेलबुडे यांना 120 तर संकपाळ यांना 2 मतांवर समाधान मानावे लागले. विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षपदासाठी किरण बनसोडे यांनी सूचना मांडली तर त्यास प्रमोद बोडके यांनी अनुमोदन दिले. विक्रम खेलबुडे यांनी अध्यक्षपदाची दशक वर्षपूर्ती करत इतिहास घडविला.


















