सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शाळा पालिकेकडे हस्तांतर करण्याचा सूचना केल्या आहेत. मुळात प्रशासकांना हे अधिकारच नाहीत अशी माहिती समोर आली आहे.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी घेण्यात आली. या बैठकीत दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी 1992 पासून हद्दवाढ झाली तेव्हा जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा महानगरपालिका हद्दीत आल्या आहेत त्या शाळा महापालिकेकडे वर्ग कराव्यात, अनेक वेळा हा विषय झाला मात्र यावर ठोस निर्णय झाला नाही. असा मुद्दा उपस्थित केला.
खालून आमदार संजयमामा शिंदे सांगत होते, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचा ठराव हा नकारात्मक आहे शाळा हस्तांतर करता येत नाहीत. परंतु पालकमंत्री विखे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दिलीप स्वामी यांना तुम्ही प्रशासक आहेत शाळा हस्तांतर करा अशा सूचना केल्या आहेत.
आमदार संजय शिंदे हे आमदार असताना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव झाला होता की शाळा हस्तांतर करता येणार नाहीत.
स्थावर मालमत्ता हस्तांतर करण्याचा अधिकार सदस्यांच्या सर्वसाधारण सभेला, प्रशासकाला नाही-सुरेश हसापुरे
मी जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हा परिषदेचा सेस वाढविण्यासाठी प्रयत्न केले. ज्या शाळा महापालिकेच्या हद्दीत गेल्या आहेत. ती जिल्हा परिषदेची स्थावर मालमत्ता आहे. त्यावेळी त्या सर्व शाळांच्या जमिनीची किंमत सहा कोटी काढण्यात आली होती, ती रक्कम महापालिकेने झेडपीला द्यावी आणि शाळा आपल्या ताब्यात घ्याव्यात. पण महापालिकेने रक्कम दिली नाही. त्यामुळे झेडपीच्या मालकीच्या स्थावर मालमत्ता हस्तांतर करण्याचा अधिकार प्रशासनाला नाही.



















