सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या टेंडरवरून जिल्हा परिषदेमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा मध्ये किती कोटीचे टेंडर झाले याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी जेष्ठ सदस्य बळीराम साठे यांच्या चेंबरमध्ये याचविषयी चर्चा रंगली होती.
दुपारच्या सुमारास काही पत्रकार साठे यांच्याशी गप्पा मारत असताना तेवढ्यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नितीन नकाते अँटी चेंबरमध्ये आले, त्यानी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा विषय काढला. बघेल तिकडे फक्त ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या टेंडरची चर्चा ऐकण्यास मिळत आहे, या टेंडरमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आमदारांना आहे का? त्यांचा काय संबंध, जिल्हा परिषद सदस्य आहेत की त्यांना सोडून आमदारांच्या ऐकण्यावरून टेंडर देणारे अधिकारी कोण आहेत. या शब्दात त्यांनी आपली नाराजी साठे यांच्यासमोर व्यक्त केली.
काका साठे यांनाही राहावले नाही. जिल्हा परिषदेमध्ये सध्या काय चाललंय हेच कळत नाही, यापूर्वी असे कधीच होत नव्हते, आणि झाले नाही आता सर्व अधिकारी बदलण्याची गरज आहे अशा शब्दात आपला संताप काकांनी व्यक्त केला.
मागील काही दिवसांमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्या हि तक्रारी वाढल्या आहेत. तब्बल 90 कोटीच्या प्रशासकीय मान्यता मध्ये त्यांनी ठराविक मक्तेदारांनाच कामे दिली असल्याचा आरोप होऊ लागला आहे. यामध्ये आता टक्केवारीचा वास येत असून या टक्केवारीवरून तर हा सर्व गोंधळ उडाला असल्याचे बोलले जात आहे.
आता तर केंद्र शासनाच्या हरघर जल योजनेत सोलापूर जिल्हा परिषदेचे कामगिरी सुमार ठरले आहे राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे सचिव वृषभ यशवंत यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समोर आल्याने कोळी यांच्या अडचणीत निश्चित वाढ झाली आहे.
सांगोला तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत सचिवापर्यंत झेडपीचे माजी सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी तक्रार केली आहे.



















