सोलापूर : जिल्ह्यातील दुसऱ्या फळीचे नेते संजयमामा शिंदे, करमाळा मतदार संघाचे आमदार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून मानले जाणारे जिल्ह्यातील नेते, मागील अडीच वर्षांमध्ये करमाळा तालुक्याचा आमदार म्हणून काम करताना संजय मामा शिंदे यांनी सर्वसमावेशक विकास करण्याच्या हेतूने आपल्या जोरावर सर्वाधिक निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळते. नुकतेच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. या अर्थसंकल्पात तालुक्यातील शेतकरी अल्पसंख्यांक समाजावर लक्ष केंद्रित केले आहे तसेच तालुक्यातील पर्यटनाचा विकास करण्याच्या दृष्टीतून मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी मंजूर करण्यात यश मिळवले आहे.
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विचार करता एकूण 28 कोटी 6 लाख निधी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मिळाला आहे. जवळपास 20 वर्षापासून करमाळा तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना एक रुपयाचाही भूसंपादन मोबदला मिळालेला नव्हता. आमदार शिंदे यांनी याविषयी कृष्णा खोरे महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार आहे.
2021 -22 च्या प्राप्त निधीमधून करमाळा तालुक्यातील मौजे करमाळा ग्रामीण, सावडी, झरे, जातेगाव, पोथरे, रावगाव, कुंभारगाव, कामोणे, पोंधवडी येथील शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार आहे.
करमाळा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीचा विषय वर्षानुवर्षे रखडलेला होता त्यावर फोकस करत राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाकडून तब्बल 1 कोटीचा निधी आमदार संजय मामा शिंदे यांनी मंजूर केला आहे. या निधीमधून उमरड, कंदर ,जातेगाव वडगाव उत्तर या गावांमध्ये कबरस्तान संरक्षण भिंत बांधणे तसेच अंतर्गत रस्ता करणे व सपाटीकरण यासाठी प्रत्येकी 7 लाख रुपये निधी मंजूर झालेले असून रावगाव , कामोणे, महेसगाव ,कुर्डू, लहू, पापनस, रोपळे क, सापटणे, उपळवटे ,दहिवली, अकुलगाव या गावातील कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे तसेच अंतर्गत रस्ता व सपाटीकरण करण्यासाठी प्रत्येकी 6 लाख याप्रमाणे 1 कोटी निधी प्राप्त झालेला आहे अशी माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.
प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१- २२ अंतर्गत पुणे विभागातील नवीन कामांना ८३ कोटी ५४ लाख निधी मंजूर झाला असून त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव करमाळा तालुक्यासाठी ४ कोटी निधी मंजूर झाला असून त्यापैकी दीड कोटी निधी जिल्हा परिषद सोलापूर कडे वर्ग करण्यात आला आहे. देवीचामाळ हे ब वर्ग हे तिर्थक्षेत्र आहे. या निधीमधून कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्ते सिमेंट काँक्रीट करणे व व पेविंग ब्लॉक बसवणे यासाठी ९९ ८० लक्ष, श्रीक्षेत्र कमला देवी मंदिराकडे जाणारे रस्ते डांबरीकरण करणे यासाठी ६७. ६४ लक्ष, श्रीक्षेत्र कमलादेवी मंदिर क्षेत्रास संरक्षक भिंत बांधणे यासाठी १४८. ७६ लक्ष, श्री. कमलादेवी मंदिरासाठी वाहनतळ करणे ९०.४० लक्ष, कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्त्यासाठी स्ट्रीट लाईट बसवणे १५ लक्ष, कमलादेवी मंदिर यात्री निवास बांधने ८०. ५४ लक्ष निधीमधून होणार आहेत.


















