‘शहर उत्तर’मध्ये भाकरी फिरवा ; विकासाचे व्हिजन नसलेले नेतृत्व आता नको ; विजयकुमार देशमुखांना मिलिंद थोबडे यांचा विरोध
सोलापूर : अमरावतीला टेक्सटाइल पार्क करीता 1 हजार कोटी रुपये मिळतात मात्र सोलापूर करीता हे मिळण्यासाठी सक्षम नेतृत्व नाही याच दुर्दैव वाटते. सोलापुरातील तरुण पुणे, मुंबई, बंगलोर, हैदराबाद या ठिकाणी का जातोय. कारण याठिकाणी तरुणांना रोजगारासाठी साधन उपलब्ध करून देण्यात 20 वर्षात यांना जमले नाही. भारतीय जनता पार्टीने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात यंदा बदल करणे आवश्यक असून भारतीय जनता पार्टीने कोणताही उमेदवार द्यावा मी त्याच्या पाठीशी उभा राहील अशी भूमिका महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा सिध्देश्वर देवस्थान विश्वस्त मिलिंद थोबडे यांनी मांडली.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर उत्तर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील इच्छुकांनी शेकडो कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी माजी महापौर, सभागृह नेते तसेच अनेक नगरसेवकांनी दंड थोपटले आहेत.
या बैठकीला माजी महापौर शोभा बनशेट्टी, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, माजी स्थायी सभापती जगदीश पाटील, चन्नविर चिटे, हेमंत पिंगळे, राजा माने, अशोक खटके, श्रीशैल बनशेट्टी, अक्षय अंजीखाने, सागर अतनुरे यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.