सॅल्युट संजीव जयस्वाल आपणास ! शहीद राहुल शिंदे यांच्या आई वडिलांना दिली विना अटी -शर्ती सदनिका
दि. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात राहुल सुभाष शिंदे हे शहीद झाले. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवत तत्कालीन शासनाने म्हाडाच्या सदनिका विनामूल्य प्रदान केल्या होत्या. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी शहीद राहुल शिंदे यांचे वडील सुभाष विष्णु शिंदे व आई श्रीमती साखराबाई शिंदे यांना कोणत्याही अटी-शर्तीशिवाय इमारत क्र. H-12, सदनिका क्र. 503, अमर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., प्रतिक्षानगर, सायन, येथे सदनिका विनामूल्य वितरित करण्याचा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला.
शहीद राहुल शिंदे यांचे आई वडिल गावाकडे वास्तव्यास असल्याने त्यांनी म्हाडाकडे सदनिकेच्या विक्रीसाठी विनंती अर्ज सादर केला होता. सदनिकेच्या मासिक आकाराची कोणतीही थकबाकी नसल्याने, म्हाडाने कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांना ना-हरकत प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी म्हाडाचे मुख्याधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
हे उदाहरण म्हाडाच्या सामाजिक बांधिलकीचे आणि कृतज्ञतेचे प्रतिक आहे, जे आपल्या वीरांचा सन्मान करण्याची जबाबदारी अत्यंत जागरुकतेने सांभाळत आहे.