दुःखद ! कम्युनिस्ट नेते सिताराम येचुरी यांचे निधन
कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, ते ७२ वर्षांचे होते.
७२ वर्षीय येचुरींवर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आयसीयूमध्ये श्वसननलिकेच्या संसर्गावर उपचार सुरू होते. येचुरींना न्युमोनियाची लागण झाल्याने १९ ऑगस्ट रोजी उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
२०१५ साली ज्येष्ठ दिवंगत नेते प्रकाश करात यांच्यानंतर सीताराम येचुरी यांची पहिल्यांदाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर २०१८ आणि २०२२ साली त्यांना दोन वेळा या पदावर राहण्याची संधी मिळाली. डाव्या पक्षातील निर्णय प्रक्रियेत सरचिटणीस हे सर्वोच्च पद मानले जाते.
सीताराम येचुरी यांनी १९७५ च्या आणीबाणीच्या काळात सरकारविरोधी आंदोलने केली आणि यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यानंतर ते CPI(M) चे एक महत्त्वाचे नेते बनले. २००५ मध्ये त्यांनी राजकीय कार्यकारिणी समितीमध्ये प्रवेश केला आणि २०१५ मध्ये पहिल्यांदा पक्षाचे सरचिटणीस झाले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने देशातील विविध आंदोलने आणि कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष केला आहे. त्यानंतर २०१८ आणि २०२२ साली त्यांची पुन्हा याच पदासाठी फेरनियुक्ती करण्यात आली होती.