पत्रकार सैपन शेख दोन जिल्ह्यातून तडीपार ; न्यायासाठी विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार
एम डी न्यूज 24 चे संपादक सैपन शेख यांना सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असून त्यांना पुणे येथे सोडण्यात आले आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाकडून झालेल्या अन्यायकारक तडीपारीच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार असून त्यासाठी आंदोलनाला परवानगी द्यावी असे पत्र विभागीय आयुक्त कार्यालयात दिले आहे.
दरम्यान सोलापुरातील पत्रकार कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सैपन शेख यांच्या तडीपारीचा निषेध नोंदविण्यात आला आहे.
सैपन अमिनसाब शेख, वय-५० वर्षे, रा. १२८, नानी मंजिल, कुर्बान हुसेन नगर, हनुमान मंदिरजवळ, उत्तर सदर बझार, सोलापूर याचेविरुध्द सन २०२३ व २०२४ या कालावधीमध्ये, साथीदारासह खंडणी मागणे, सरकारी नोकर काम करत असताना त्यांना दमदाटी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द सदर बझार पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. २३०५/२०२४ दि.११/०९/२०२४ अन्वये, इसम नामे, सैपन अमिनसाब शेख, वय-५० वर्षे, रा. १२८, नानी मंजिल, कुर्बान हुसेन नगर, हनुमान मंदिरजवळ, उत्तर सदर बझार, सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आलेले आहे.