सोलापूरच्या साक्षरता वारीची केंद्रीय शिक्षण विभागाकडून दखल ; आषाढीत घेतला इतक्या वारकऱ्यांनी लाभ
आषाढी वारीचे औचित्य साधून “वारी साक्षरतेची” हा साक्षरता कार्यक्रमाच्या प्रसार आणि प्रचारासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. संचालक योजना महेश पालकर व उपसंचालक राजेश क्षिरसागर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोलापूर जिल्हयामध्ये राबविण्यात आल्याची शिक्षणाधिकारी योजना सुलभा वटारे यांनी दिली.
सोलापूर जिल्हयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे वारकरी वर्ग, दिंडी व पालख्यांचे प्रमाण लक्षात घेता नियामक परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. ११ ते १७ जुलै या कालावधीत पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात आले. जिल्हाभर सर्व शाळांमध्ये प्रति साक्षरता दिंडी सोहळा उत्स्फुर्तपणे पार पडला जिल्हयातील पालखी मार्गावरील सर्व शाळांमध्ये साक्षरता फलक, भित्तीपत्रके व बॅनर लावून साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार केला. तर वारीतील सर्व वारकऱ्यांना साक्षरता कार्यक्रमांच्या प्रसारपत्रकांचे वाटप करून प्रसार करण्यात आला.
पालखी मार्गावरील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, तालुकास्तरीय सर्व अधिकारी, शिक्षणाधिकारी योजना यांचे मार्फत दिंडीतील वारकऱ्यांना प्रसारपत्रके वाटप करण्यात आली. याचबरोबर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत असणाऱ्या २७९ ते ३७८ या दिंडयामधील असाक्षर वारकऱ्यांचे सर्वेक्षण अकलूज परिसरातील सर्व शिक्षकांनी पालखी मुक्कामा दरम्यान केले यामध्ये ५९० असाक्षर वारकरी आढळून आले.
प्रत्येक पालखीसोबतच्या दिंडीचे पालखी मार्गावरील सर्व शाळांनी साक्षरता रांगोळी, प्रतिदिंडी, घोषवाक्य, बॅनर यासह राज्य साक्षरता दिंडीचे स्वागत केले. उल्लेखनीय म्हणजे दि. ११ ते १७ जुलै २०२४ या कालावधीत गीताद्वारे साक्षरता प्रचार करण्यासाठी मोहोळच्या स्वानंद टिचर्स म्युझिकल ग्रुपने स्वरचित रेकॉर्ड केलेला साक्षरता गीतांचा गीतमंच कार्यक्रम खूपच प्रभावी ठरला. या ग्रुपने आषाढी वारी दिवशी साक्षरतेच्या वारीमध्ये केलेला साक्षरतेचा जयघोष अत्यंत प्रभावी ठरला. यासाठी या शिक्षकांनी अत्यंत उत्कृष्ठ कार्यक्रम सादर केला. त्याचे युटयुब व फेसबुक लाईव्ह द्वारा स. १०.०० ते १.०० या वेळेत महाराष्ट्रभर प्रसारण करण्यात आले. साक्षरता दिंडी यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डाएट वेळापूर, गटशिक्षणाधिकारी सर्व, तालुका साधन व्यक्ती सर्व, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, पदाधिकारी आणि तंत्रस्नेही अधिव्याख्याता बुधाराम सर, साधनव्यक्ती लक्ष्मण भोसले, स्वानंद टिचर्स ग्रुपचे रूपेश क्षिरसागर, महेश कोठीवाले, एकनाथ कुंभार, किरणकुमारी गायकवाड, हेमलता व्हटकर, कालिंदी यादव, अरूंधती सलगर, तंत्रस्नेही शिक्षक दिपक पारडे व रमेश साठे आणि अकलूज केंद्रातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले.