मुस्लिम समाजाच्या वक्फ बोर्ड जमिनीवर मोदी सरकारचा डोळा ; आडम मास्तर यांचा आरोप
सोलापूर दिनांक – जोपर्यंत देशात सेक्युलर पक्षाचे वर्चस्व अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत कामगार, कष्टकरी,दलित आणि अल्पसंख्याक समाजावरील संकट दूर होणार नाही. आपल्या भारत देशात वक्फ बोर्डाची सुमारे नऊ कोटी एकर जमीन असून त्यावर मुस्लिम समाजाचा हक्क आहे.परंतु या जमिनीवर मोदी सरकारचा डोळा असून ती बळकावण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी केले.
बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे इंपिरियल गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर ‘शहर मध्य के लिए आडम मास्तर ही क्यों?’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ऍड.एम.एच. शेख हे होते.
यावेळी मंचावर सय्यद इरफान सर, रे नगरच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी, वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, फियाजोद्दीन आबादीराजे, अकील शेख मेंबर, जाफर मुल्ला, पीर अहमद कुरेशी, अकील बाशा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्याची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावी पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले की, आगामी निवडणुकीत आडम यांना आमदार म्हणून निवडून दिल्यास वक्फ बोर्डासाठी आपण रस्त्यावरची लढाई लढू असा निर्धार त्यांनी मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात केला. तसेच आपण आमदार असताना सोलापुरातील मुस्लिम समाजासाठी केलेल्या कार्याचे स्मरण आडम मास्तरांनी आपल्या भाषणातून केले. मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास आपण सरकारला भाग पाडू असा विश्वासही आडम यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांचाही समाचार घेतला.
रे नगरचे सचिव कॉ. युसुफ मेजर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले सच्चर कमिटीने सादर केलेल्या मुस्लिम समाजाच्या सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीवर कोणत्याही पक्षाने आवाज उठवला नाही. मात्र आडम मास्तर यांनी अल्पसंख्यांक समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी २२५०० घरकुलांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आणला.
वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनीही आडम मास्तरांच्या कार्याचे कौतुक केले. रिक्षाचालकांच्या न्याय्य मागण्यासाठी लढणाऱ्या आडम मास्तरांना आपण सर्व चालकांच्या संमतीने विधानसभा निवडणुकीत सहकार्य करू असे आश्वासन रियाज सय्यद यांनी दिले.
याप्रसंगी इरफान सय्यद,साथी बशीर अहमद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. साथी बशीर शेख यांनी लेबर पार्टी (महाराष्ट्र) च्यावतीने आडम मास्तर यांना पाठिंब्याचे पत्र दिले.हाजी महेबूब हिरापुरे यांनी 11000 रुपये निवडणूक निधी दिला. कार्यक्रमाच्या शेवटी ऍड.एम.एच शेख यांनी उपस्थित समाज बांधवांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांद मुजावर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दाऊद शेख,आसिफ पठाण, अकील शेख, अबूहुरेरा शेख, समीर शेख,बजरंग गायकवाड,नरेश दुगाणे, युसुफ शेख, मजहर आगवाले, हुसेन शेख,जावेद सगरी, जुबेर सगरी, विल्यम ससाणे,रफिक काझी, वसीम मुल्ला,वसीम देशमुख, हसन शेख, कादर शेख आदींनी परिश्रम घेतले. जाहीर मेळाव्यास मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.