आमदार राजू खरे बाजार समितीच्या निवडणुकीत ताकदीने उतरणार
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अठरा जागांसाठी तब्बल 429 अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यासाठी अजून पंधरा दिवस लागतील. पण कुणाकुणाचे पॅनल उतरणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत.
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे निवडणुकीत उतरल्याने रंगत पाहायला मिळत आहे. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे काय निर्णय घेतात याची उत्सुकता लागली आहे. आता या रणांगणात मोहोळचे आमदार राजू खरे हे उडी घेणार आहेत. तशी त्यांनी भूमिका बोलून दाखवली.
मोहोळ विधानसभा मतदारसंघात उत्तर सोलापूर तालुक्यातील 22 गावांचा समावेश आहे त्या गावांमधील ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक हे मतदार असल्याने आमदार खरे यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे दिसत आहे.
उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते बळीराम काका साठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राजू खरे म्हणाले, माझ्या मतदारसंघातील मतदार पाहता आमचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्याशी चर्चा करून ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. खरे आता निवडणुकीत उतरणार असल्याने नक्कीच रंगत येणार यात शंका नाही.