मोबाईल स्क्रीन व्यक्तीने किती वेळ पहावी ! डॉ स्वाती शहाणे काय म्हणाल्या वाचा ही बातमी
सोलापूर : बुधवार, दि. ११ जून रोजी श्री शुभराय महाराज मठात डॉ. स्वाती शहाणे यांचा “स्क्रीन आणि आपण सगळे” या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
व्याख्यानाला सुरुवात करताना डॉ. स्वाती शहाणे यांनी स्क्रीन या शब्दाची व्याख्या, त्याचा अर्थ आणि त्याची व्याप्ती याबद्दल माहिती करुन दिली. पूर्वी स्क्रीन म्हटले कि लोकांना सिनेमा हॉल मधील मोठा पडदा असा अर्थ प्रचलित होता. कालांतराने घराघरात टेलिविजन आल्यावर स्क्रीन म्हणजे छोटाही पडदा असाही अर्थ प्रचलित होऊ लागला. नंतर संगणकाचा चा शोध लागल्यावर घरोघरीच नाही तर कार्यालयात, विद्यालयात आणि अनेक ठिकाणी त्याचा वापर होऊ लागला. कम्प्युटर ही एक काळाची गरज होऊन बसली. आता तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत आणि मनोरंजनापासून ते करिअर, कार्यालयीन कामपासून ते व्यवसायापर्यंत तसेच संपर्काचे प्रभावी माध्यम म्हणून मोबाईलचा वापर ही एक मूलभूत आणि अपरिहार्य गरज बनली आहे. त्याचे चांगले तसेच वाईटही परिणाम आहेत. सोशल मीडिया उदा. फेसबूक, इन्ष्टा-ग्राम, स्न्याप-चाट, इत्यादि, नेटफ्लिक्स सारखे ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म, गूगल आणि यूट्यूब सर्च अल्गोरीदम, मोबाईल गेम रिवॉर्ड्स ने होणार डोपामिन रिलीज, इत्यादि हे मोबाईलच्या आहारी जाण्याची काही कारणे आहेत. मोबाईल आणि इंटरनेट वापरामध्ये आपली काही प्रायव्हसी रहात नाही.
मोबाईल चा फक्त गरजेच्या गोष्टी साठी मर्यादीत वापर करावा. ऑनलाइन शॉपिंग हे मोबाईल स्क्रीन च्या आहारी जाण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे ज्यामुळे घरबसल्या पाहिजे त्या वस्तु मागवून विकत घेता येतात. यात आर्थिक धोकाही निर्माण होण्याची शक्यता असते. मोबाईलचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी इतरांशी व्यक्तिगत रित्या भेटणे, घराबाहेर पडणे आणि घराबाहेर जाताना मोबाईल शक्यतो घरी ठेवणे, झोपण्यापूर्वी एक तास अगोदर मोबईल बंद करून तो दुर ठेवणे, इत्यादि गोष्टी कराव्यात. लहान मुलांना मोबाईल च्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी पालकांनी स्व:त प्रयत्न केले पाहिजेत. लहान मुलांमध्ये मोबाईल च्या जास्त प्रमाणातील वापरामुळे लठ्ठपणा वाढत आहे. मोबाईल चा अनावश्यक वापर टाळण्यासाठी काही मोबईल ॲप्स आहेत त्याचा वापर करावा उदा. स्क्रीन टाइम, रेस्क्यु, फ्रीडम, फॉरेस्ट, मुव्हमेंट आदी.
प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी स्क्रीन चा किती वापर करावा याची काही मर्यादा डब्ल्यु.एच.ओ. (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइज़ेशन) यांनी काही मर्यादा निश्चित केली आहे ती अशी, शून्य ते २ वर्षे वयोगटासाठी शून्य (फक्त दूरच्या नातेवाईकांशी विडियो कॉल वर संपर्क एवढाच), दोन ते पाच वर्षे वयोगटासाठी दररोज एक तासापेक्षाही कमी, सहा ते बारा वर्षे वयोगटासाठी एक ते दोन तास, टिनएजर (वय वर्षे १३ ते १९) साठी दोन ते तीन तास, ते ही फक्त शालेय अभ्यासासाठीच, आणि प्रौढ व्यक्तिंसाठी तीन ते चार तासांपेक्षा कमी वापर करणे आरोग्यासाठी योग्य ठरेल.
मोबाईल चा चांगल्या प्रकारे ही उपयोग होऊ शकतो. छंद जोपासण्यासाठी, उपलब्ध होणाऱ्या नवनवीन वेगवेगळ्या रोजगाराच्या संधीचा फायदा घेण्यासाठी, व्यवसाय वाढीसाठी, तत्पर ग्राहक सेवेसाठी, इत्यादि. लहान मुलांना आजच्या काळात मोबाईलच्या वापरपासून रोखणे जवळ जवळ अशक्य आहे त्यामुळे मुलांना मोबाईल वापरू देताना त्याचा सदुपयोग कसा होईल याचा विचार पालकांनी करावा.
डॉ. स्वाती यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. स्वाती शहाणे यांचे स्वागत व ओळख कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व पाखर संकुलचे ध्रुव कांबळे यांनी करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी श्री शुभराय महाराज मठाचे शुभांगी बुवा यांनी डॉ. स्वाती शहाणे व सर्व उपस्थितांचे आभार मानले.