सुभाष देशमुखांना दक्षिणमध्ये समन्वयक न मिळणे हे भाजपचे दुर्दैव ; मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्ता दिसला नाही का?
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीने विधानसभा मतदारसंघ निहाय समन्वयकांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये सोलापुरातील दक्षिण सोलापूर विधानसभा आणि बार्शी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या मुलांना समन्वयक म्हणून नेमले आहे यावर आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधून टीकेचे झोड उठली आहे.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांना समन्वयक म्हणून नेमले आहे. त्यामुळे देशमुखांच्या विरोधात गेलेल्या सुमारे आठ नगरसेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंघात असा कोणताही पदाधिकारी आणि कार्यकर्ता नाही का की ज्याला समन्वयक म्हणून नेमता आले असते. सध्या राज्यामध्ये तीन पक्षाची महायुती असून या तीनही पक्षाची समन्वयक साधणारा कार्यकर्ता पक्षाने शोधायला पाहिजे होता अशी नाराज प्रतिक्रिया माजी उपमहापौर राजेश काळे यांनी दिली आहे.
तर माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी तर बापाच्या मतदारसंघात मुलगा समन्वयक कसा होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दक्षिण मतदार संघात अनेक नगरसेवक विद्यमान आमदारावर नाराज आहेत परंतु त्यांनी एक एकदा तरी या नाराज नगरसेवकांची बैठक लावली का? त्यांची नाराजी जाणून घेतली का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
आता या समन्वयक निवडीवरून भारतीय जनता पार्टीमध्ये एक नवीनच वाद पेटला असून त्यावर पक्ष कशा पद्धतीने तोडगा काढतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.