सोलापुरात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू ; दोघांची प्रकृती गंभीर, दूषित पाण्याचे बळी असल्याची चर्चा
सोलापूर शहरातील मोदी परिसरात असलेल्या बाबू जगजीवन राम झोपडपट्टी मधील दोन विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करीत महापालिकेला याप्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे भागातील नागरिक सांगत आहेत.
बाबू जगजीवन राम झोपडपट्टी मधील मरण पावलेल्या या मुलांची नावे अद्याप समोर आली नाहीत, इयत्ता नववी मध्ये हे विद्यार्थी शिकत असल्याचे माहिती मिळत असून आणखी दोन विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे समजले.
शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्यासह त्या भागामध्ये भेट दिली असताना नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात बऱ्याच तक्रारी मांडल्या. यावेळी आमदार कोठे यांनी महापालिका आयुक्तांना फोन लावून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार कोठे यांनी संबंधित विद्यार्थ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे पोस्टमार्टम सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन केले.