मनोहर सपाटेंनी आजवर कमावलेले सर्वच घालवले ! समाजाने मारले जोडे, नावाची पाटीही तोडली
सोलापूर : मनोहर सपाटे यांच्या विरोधात आता सोलापूर शहरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यांनी प्रतिमेला जोडे मारून विकृत सपाटे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून मराठा सेवा मंडळातून मनोहर सपाटे यांची हकालपट्टी करावी तसेच त्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी लावून धरली आहे. यामुळे मनोहर सपाटे यांनी आजवर कमावलेले सर्वच घालवले असे चर्चा आता सोलापुरातून ऐकण्यास मिळत आहे.
“कमवायला बरेच वर्ष लागतात पण घालवायला काही क्षण” सुद्धा लागत नाहीत अशी काही गत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर मनोहर सपाटे यांची झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एका महिलेच्या अंगाशी झोंबाझोंबी करत तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आणि सपाटे यांचे होत्याचे नव्हते झाले. यापूर्वी सपाटे यांच्यावर असे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. एका गुन्ह्यानंतर माणूस शहाणा होतो पण माझं काय वाकड होणार या आविर्भावात ते आता चांगलेच अडचणीत आल्याचे पाहायला मिळते.
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय निष्ठावंत म्हणून ख्याती मिळवणारे मनोहर सपाटे. सोलापूर शहराचे महापौर, शहराचं अध्यक्षपद त्यांना मिळाले, महापालिकेत अनेक पदे भोगली. दोन ते तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. पण अशा काही कृत्यांनी त्यांनी स्वतःला बदनाम करून घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पक्षानेही निलंबित केले.
या प्रकरणात त्यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता तर त्यांच्या विरोधात संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. एका नेत्याच्या अशा प्रकरणात समाज रस्त्यावर उतरला असे यापूर्वी तर पहायला मिळाले नाही. अशा प्रवृत्तीमुळे समाज बदनाम झाला म्हणून समाजातील ज्येष्ठ दिलीप कोल्हे, राजन जाधव, अमोल शिंदे, माऊली पवार, पुरुषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण, नाना मस्के, विनोद भोसले, सुनील रसाळे, अनंत जाधव, किरण पवार, लहू गायकवाड, हरिभाऊ घाडगे यांच्यासह समाजातील अनेक नेत्यांनी सपाटे यांच्या शिवपार्वती लॉज समोर निदर्शने करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले.
हरीभाई देवकरण प्रशालेच्या बाजूला असलेल्या मनोहर सपाटे सांस्कृतिक भवन हे नाव हटवून बाबासाहेब गावडे सांस्कृतिक भवन असे नामकरण करण्याची मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले असून सपाटे यांच्या गैर व्यवहाराची चौकशी व्हावी अशी ही मागणी समाजातून पुढे आली आहे.