पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा सरपंच ग्रामसेवकांना हा सल्ला ; आदर्श ग्रामसेवक, सुंदर गाव, महा आवास अभियान पुरस्काराचे थाटात वितरण
सोलापूर :
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आर .आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार, अमृतमहावास अभियान पुरस्कार, व आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले. हा कार्यक्रम पंढरपूर शहरातील श्री यश पॅलेस येथे झाला .
व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकांदे, प्रकल्प संचालक अमोल जाधव, प्रणव परिचारक, पवन महाडिक, ओएसडी बाळासाहेब यादव यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मी बाराशे लोकसंख्येच्या गावात राहणारा नागरिक आहे, छोट्या गावाशी जोडला असल्याने, तिथले प्रश्न विकासाचे मुद्दे मला माहिती आहेत. गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, बिडिओ व्यवस्थित असेल तर गावचे काम चांगले होते, खरंच तुम्ही गावच्या विकासाला मदत केली असेल, खरेच तुम्ही अभिनंदनीय आहेत, तुमच्याशिवाय गावचा विकास शक्य नाही.
ग्रामीण विकासासाठी जिल्हा परिषदेला आम्ही खूप निधी देतो, जीएसटी मुळे निधीची कमतरता नाही. जनसुविधेला 37 कोटी दिले, नागरी सुविधा दलित वस्ती सुधार योजनेला मोठा निधी असतो. गावातल्या अनुसूचित जातीच्या वस्तीला सुधारण्यासाठी दरवर्षी पैसे येतात, त्यांची अवस्था पाहिली तर पैसे जातात कुठे, कुठे तरी काही तरी चुकते, या वस्तीचा निधी नीट वापरला जात नाही, या वस्त्यांमध्ये योजना योग्य राबविल्या का? सुविधा दिल्या गेल्या का? असे प्रश्न उपस्थित करीत ग्रामसेवक व सरपंच यांनी त्या निधीचा नीट उपयोग करायचा ठरवला तर निश्चितच गावांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
समाधान आवताडे म्हणाले, प्रत्येक गावांमध्ये अशा स्पर्धा व पुरस्कार ठेवले तर गावागावात वातावरण तयार होईल, गाव सुधारतील, गाव सुधारण्यात ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची असते, ग्रामसेवक हे सगळे चांगले काम करतातच, ज्यांना पुरस्कार मिळाला नाही असे ग्रामसेवकांनी अजून चांगले काम करावे, ग्रामसेवकांनी मनावर घेतले तर ग्रामीण भागाचा नक्कीच विकास होऊ शकतो.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले की, ओबीसीसाठी आवास योजना आहे त्याचे काम सोलापूर जिल्ह्यातील शंभर टक्के पूर्ण केले, जिल्हा परिषदेचा गाभा हा ग्रामपंचायत आहे, त्या विभागात चांगले काम झाले तरच झेडपीचे नावलौकिक होते, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू असून सोलापूर जिल्हा हा प्रत्येक योजनेत पहिल्या तीन क्रमांकात राहण्यासाठी आमचा कायम प्रयत्न आहे.
प्रारंभी प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी कार्यक्रमाची रोपरेषा सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाल्याने या कार्यक्रमात कोणाचाही सत्कार करण्यात आला नाही, अत्यंत साध्या पद्धतीने मात्र उत्साहात कार्यक्रम पार पडला.