अवघ्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्यने केली सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई…
कोल्हापूर : तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे, मध्येच व्यत्यय आणण्यासाठी आवासून उभा असणारा सोसाट्याचा वारा. असा अनेक अंगांनी चॅलेंजिंग असणाऱ्या लिंगाणा सुळक्यावर भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक साम्राज्य मराठे या कोल्हापूरच्या अवघ्या पावणेचार वर्षाच्या बालकाने क्लाइंबिंग व रॅपलिंग द्वारे लिंगाणा आरोहन मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील साम्राज्य मराठे हा भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक असून त्याने याआधी सह्याद्रीतील अतिउच्च कळसुबाई शिखर अवघ्या पावणे दोन वर्ष वय असताना सर केले आहे. साम्राज्यचे मुळगाव गोरंबे ता. कागल असून कामानिमित्त आई वडील गारगोटी ता. भुदरगड येथे वास्तव्यास आहेत. भुदरगड तालुका हा नैसर्गिकरीत्या समृद्ध जंगलाने व्यापलेला आहे.
आई-वडिलांना जंगल सफारीची आणि ट्रेकिंग ची आवड असल्यामुळे साम्राज्यला अवघ्या आठ महिन्यांचे वय असल्यापासूनच आई-वडिलांसोबत जंगलात फिरण्याची सवय लागली.. दाजीपूर अभयारण्य मधील अति दुर्गम शिवगड, आंबोली घाटातील अवघड आणि दमछाक करायला लावणारा मनोहर- मनसंतोष गड, दुर्गम रांगणा किल्ला, हे स्वराज्याचे अवघड किल्ले अवघ्या दीड वर्षाच्या साम्राज्यने यशस्वीरीत्या पूर्ण केले.
त्याच्यातील कौशल्य पाहून तो अगदी पावणे दोन वर्षाचा असताना महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर करण्याचा मानस आई-वडिलांनी ठेवला आणि मोठ्या जिद्दीने साम्राज्य ने सर्वात उंच आभाळी जाणारे कळसुबाई शिखर यशस्वीरित्या चढाई करून भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा बहुमान मिळवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर किल्लादेखील साम्राज्यने काही महिन्यापूर्वीच सर केला आहे.
याशिवाय साम्राज्य हा स्केटिंग खेळामध्ये उत्कृष्ट खेळाडू असून आतापर्यंत अनेक पदके मिळवली आहेत. तसेच त्याला रेसिंग बाईक्स, ऑफरोडींग जिप्स चा थरार पहावयास आवडतो. उन्हाळी सुट्टीतील एडवेंचर कॅम्प मधून साम्राज्यला क्लाइंबिंग व रॅपलिंग ची ओळख झाली होती. ह्या अनुभवाच्या जोरावर साम्राज्य कडून गारगोटी जवळील तळेमाऊली पठारावर क्लाइंबिंग आणि रॅपलिंग चा सराव गेल्या महिन्याभरापासून त्याचे वडील इंद्रजीत मराठे फावल्या वेळेत घेत होते.
ह्या सरावा दरम्यान साम्राज्य मधील उत्साह पाहून स्वराज्याच्या अभेद्य असणाऱ्या, गगनाला भिडणाऱ्या लिंगाणा सुळक्यावर चढाई करण्याचे ठरविण्यात आले. हा सुळका साधा सुधा सुळका नसून 70 ते 80 डिग्री मध्ये उभा असणारा,भल्याभल्यांना घाम फोडायला लावणारा, स्वराज्याचे कारागृह, महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगेतील सर्वात अवघड किल्ला……
जो क्लाइंबिंग, रॅपलिंग करत सर करावा लागतो यासाठी प्लेस टू प्लेस आणि सह्याद्री ट्रेकर्स या टेक्निकल टीमची मदत घेण्यात आली.
यासाठी लिंगाणा आरोहण मोहीमचे आयोजन या टेक्निकल टीमच्याद्वारे करण्यात आले. यामध्ये पुणे, रत्नागिरी, सांगली व कोल्हापूर येथील जवळजवळ 28 ट्रेकर्सनी साम्राज्य सोबत सहभाग नोंदवला होता.
4 जानेवारी 2025 च्या पहाटे सकाळी 6:00 वाजता मोहरी गावातून ट्रेकिंगला सुरुवात करण्यात आली. साधारण एक तास 30 मिनिटांनी रायलिंग पठारावती पोहोचून क्लाइंबिंग आणि रॅपलिंगसाठी लागणारे सर्व इक्विपमेंट परिधान करून महाराष्ट्रातील सगळ्यात अवघड, चालायला कठीण अशा बोराट्याच्या नाळेमध्ये साम्राज्य टेक्निकल टीम सोबत उतरला. खडतर-दरीतील वाटेतून तो बिनधास्त चालत होता. बोराट्याची नाळ ते लिंगाणा खोल दरीतील अवघड बोल्डर्स पार करत… सकाळी 9 वाजता लिंगाणा बेस पॉईंटला तो पोहोचला. अतिशय कठीण अशी बोराट्याची नाळ आणि हे बोल्डर्स पार करताना भल्याभल्यांना धडकी भरते.
असा हा अतिशय कठीण ट्रेकिंगचा टप्पा पूर्ण केल्यानंतर लिंगाणा सुळक्याचे पूजन करण्यात आले व आरोहण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
अतिशय अवघड चढाईचे आव्हान कोल्हापूरच्या साम्राज्य मराठे ह्या अवघ्या पावणे चार वर्षांच्या चिमुकल्याने रोप क्लाइंबिंग आणि रॅपलिंग च्या सहाय्याने 3100 फुटांच्या सुळक्यावर त्याच्या आई वडिलांच्या व मार्गदर्शकांच्या मदतीने चढाई करण्यात साम्राज्य यशस्वी ठरला. सकाळी सहा ते रात्री 9:20 जवळजवळ 15 तास 20 मिनिटे या संपूर्ण मोहिमेला लागले. साम्राज्य मराठे हा लिंगाणा सुळक्यावर चढणारा कोल्हापूरचा भारतातील सगळ्यात लहान गिर्यारोहक ठरला आहे.
या लिंगाणा आरोहन मोहिमेमध्ये सह्याद्रीतील बेस्ट टेक्निकल मार्गदर्शक अरविंद नेवले, अमित पिष्टे, प्रशांत पाटील, अनिल पाटील, आम्रेश ठाकुर देसाई यांची टीम त्याच बरोबर पत्रकार सायली मराठे, वडील इंद्रजित मराठे, त्याच बरोबर राज्याच्या विविध जिल्ह्यांतून या मोहिमेत ट्रेकर्स सहभागी झाले होते.