आमदार देवेंद्र कोठे यांच्या पहिल्याच पाठपुराव्याला यश ; तब्बल 89 कोटी आले सोलापूरला
सोलापूर : सोलापूर शहर मध्य या मतदारसंघाचे भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी निवडून आल्यानंतर झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सोलापूरच्या समांतर जलवाहिनी संदर्भात प्रश्न मांडला होता. एकशे दहा किलोमीटर असलेल्या या दुहेरी जलवाहिनीचे काम 106 किलोमीटर झाले आहे. केवळ चार किलोमीटर काम निधी अभावी बाकी आहे.
सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होतो त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो, दुहेरी जलवाहिनी लवकरात लवकर झाली तर पाण्याचा प्रश्न मिटेल त्यासाठी निधी देऊन महानगरपालिका प्रशासनाला तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली होती.
हा मुद्दा देवेंद्र कोठे यांनी डिसेंबर महिन्यात मांडला आणि एका महिन्यातच सोलापूर शहराच्या दुहेरी जल वाहिनीसाठी एकूण 89 कोटी रुपये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत वितरित करण्याचा आदेश राज्याच्या नगर विकास विभागाने काढला आहे. सदर निधी हा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महापालिका आयुक्त यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. सदर निधी हा त्याच कामासाठी खर्च करण्यासह तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना या आदेशात करण्यात आल्या आहेत.