चार महिन्यांपासून निराधारांचे अनुदान प्रलंबित ; सोलापुरात महिला संघटना सरसावली !
वर्ल्ड ऑफ वुमेन्स संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा विद्या लोलगे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय वृध्दापकाळ श्रावणबाळ योजनेमधील विधवा, घटस्फोटीता, दिव्यांग, निराधार, जेष्ठ नागरिकांना मागील ४-५ महिन्यापासुन दरमहा मिळणारे अनुदान / अर्थसहाय्य मिळालेले नाही. त्यामुळे अशा निराधार व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे.
अशा अनेक व्यक्तींना या अर्थसहाय्यमधील रक्कमेचा मोठा आधार असतो. यामधून ते गंभीर आजारावरील औषधे, वैद्यकीय उपचार घेत असतात, अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळे त्यांचे रोजचे जीवन असाह्य झाले आहे. ही रक्कम वाढवुन कृपया दुप्पट म्हणजे दरमहा रक्कम रु.३००० पर्यंत करण्यात यावी.
तसेच या योजनेमधील लाभार्थ्यांना पुढील काळात डी.बी.टी. योजनेद्वारे रक्कम थेट खात्यात दिली जाणर आहे. परंतु ६५ ते ७० वर्षापुढील वृध्दांना आपल्या बँक खात्याला, मोबाईल नंबर संलग्न करणे शक्यच नाही. कारण अशा व्यक्ती मोबाईल कोठून बाळगणार आहेत? वयोमानानुसार मोबाईल हाताळणे शक्य नाही, कृपया त्यातून सूट मिळावी.
तरी या सर्व बाबींचा विचार करुन मार्च अखेर मागील ४-५ महिन्याचे प्रलंबित असलेली रक्कम तातडीने त्यांना देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी लता फुटाणे, सायरा शेख, लता ढेरे, यशोदा सोनवणे, गीतामुळे, विनयश्री किरनल्ली, रेश्मा शेख, अनुराधा माशाळकर, छाया गायकवाड, कविता येरवे, आशा शिंदे, लक्ष्मी पवार, विदर्शना वाघमारे, शोभा गायकवाड, प्रमिला स्वामी, वर्षा मुनगा पाटील, सरोजनी जाधव यांची उपस्थिती होती.