‘ वंचित’च्या सोलापूर व माढा लोकसभेसाठी दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल ; तर त्या मुलीच्या नावे २५ लाख बँकेत ठेवावे
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने सोलापूर राखीव लोकसभेसाठी राहुल गायकवाड तर माढा सर्वसाधारण लोकसभा मतदारसंघासाठी मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर या दोन्ही उमेदवारांनी सोमवारी मिरवणुकीने अर्ज दाखल केले.
वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे चार हुतात्मा स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोठी वाजत गाजत मिरवणूक काढून सात रस्ता येतील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद व माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.
राहुल गायकवाड म्हणाले, दोन्ही उमेदवार विकासाच्या प्रश्नाऐवजी एकमेकांवर टीका टीपणी करण्यात गुंतले आहेत. परंतु जनता काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीला ही कंटाळली आहे त्यामुळे यंदा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निश्चित विजय होणार असा दावा केला.
रमेश बारस्कर म्हणाले, यापूर्वी ज्या मुलांना लग्नास मुली मिळत नाहीत त्यासाठी आम्ही सोलापूर जिल्ह्यात आंदोलन उभे केले होते. या निवडणुकीत विजय झाल्यानंतर पहिल्या संसदेच्या अधिवेशनात ज्या मुलांचे लग्नाचे वय निघून गेले आहे त्या मुलांची जी मुलगी लग्न करेल तिच्या नावे 25 लाख रुपये शासनाने बँकेत एफडी करावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.